मुंबई महानगरात २ बीएचके घरांना ग्राहकांची अधिक पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:07 AM2021-03-16T04:07:28+5:302021-03-16T04:07:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. क्रेडाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील अनेक वर्षांपासून मुंबई महानगरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. क्रेडाई एमसीएचआयने नुकताच आपला एक संशोधन अहवाल जाहीर केला. त्यानुसार मागील चार वर्षांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रात ८७ टक्के ग्राहकांनी २ आणि २.५ बीएचके घरांना अधिक पसंती दर्शविली आहे. या घरांची किंमत सरासरी ५५ लाख इतकी आहे.
क्रेडाईच्या संशोधन अहवालात सीबीडी मुंबई, मध्य मुंबई, मध्य उपनगरे, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे, ठाणे, रायगड आणि पालघर या ८ विभागांच्या रिअल इस्टेट बाजारपेठेचे सखोल व माहिती पूर्ण विश्लेषण करण्यात आले आहे.
भारतातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत अत्यंत महागडी घरे असल्याने येथे गृहकर्जही अधिक प्रमाणात घेतले जातात. परिणामी मुंबई महानगर क्षेत्रात २ आणि २.५ बीएचके या परवडणाऱ्या घरांना मागणी अधिक आहे. २०२१च्या जानेवारी आणि फेब्रुवारीतही ६० टक्के ग्राहकांनी २ बीएचके घरांना अधिक पसंती दर्शविली. ज्याची २० हजार ७३६ कोटी रुपयांची उलाढाल झाली.
क्रेडाईच्या एमएमआर हाऊसिंग टाइपोलॉजी अहवालात सांगण्यात आले आहे, की कोरोनाची साथ असूनही सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये २०१९च्या तुलनेत २०२० मध्ये अधिक गृहखरेदी झाली. मध्य मुंबईत २०२१ मध्ये ४ बीएचके घरांना अधिक पसंती मिळाली. ज्यांची सरासरी किंमत १३ कोटी रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीत मध्य मुंबईत १८४ ४ बीएचके घरे विकली गेली. ज्यात १ हजार ८६२ कोटी रुपयांची उलाढाल झाली. मध्य उपनगरात ३ बीएचके घरांना ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली त्याची सरासरी किंमत ३.६ कोटी रुपये होती.
पूर्व उपनगरांमध्ये २ आणि ३ बीएचके घरांना ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली त्याची सरासरी किंमत १.७ कोटी रुपये होती. तर पश्चिम उपनगरांमध्ये २.५ बीएचके घरांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळाली.
यासंदर्भात क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोराडिया म्हणाले की, या अहवालामुळे ग्राहकांना नेमके काय हवे आहे याची माहिती मिळाली. त्यामुळे भविष्यातील प्रकल्पांसाठी एक निश्चित धोरणात्मक दिशा सापडली. यामुळे रियल इस्टेट क्षेत्राला नवी चालना मिळून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत वाढ होऊ शकेल.
* बुलेट ट्रेननंतर मागणी वाढणार!
मागील तीन वर्षांमध्ये घरांच्या किमतीत वाढ झाली असून आता ठाणे विभागात २ बीएचके घराची किंमत सरासरी ५४ लाख एवढी आहे. रायगडमध्ये १ बीएचके घरांना ६६ टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली असून त्याची सरासरी किंमत २७ लाख आहे. तर पालघरमध्ये १ आणि २ बीएचके घरांना ९४ टक्के नागरिक पसंती दर्शवीत आहेत. येत्या काळात बुलेट ट्रेन झाल्यानंतर येथे मोठ्या घरांच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.