मुंबई/कोल्हापूर : मुंबई शहर आणि उपनगरात मंगळवार, बुधवार, गुरुवार असे सलग तीन दिवस वादळवाऱ्यासह मुसळधार पावसाची नोंद होत असून, बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरुवारी पहाटे ५.३० पर्यंत तब्बल ३३० मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली. आॅगस्टमधील सर्व रेकॉर्ड या पावसाने मोडीत काढले.
कोकणातही वैभववाडी येथे गेल्या चोविस तासांमध्ये ७१० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला असला तरी पंचगंगा धोक्याच्या पातळीवरून वाहत असून नदीकाठच्या काही गावांंमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. रायगडमध्ये पावसाचे धुमशान सुरूच असल्याने अलिबाग, पेण, माणगाव, म्हसळा, महाड या तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे.पंचगंगेची धोका पातळीकोल्हापूर : गुरुवारी पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदी आता ४३ फुटांवरून वाहू लागली असून नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने धास्ती वाढली आहे. महापुराचा इशारा देणारा रेडेडोहही फुटला आहे.राधानगरी धरण ९६ टक्के भरले असून, स्वयंचलित दरवाजे उघडण्याच्या मार्गावर आहेत. १०२ बंधारे पाण्याखालीच आहेत. ६ आॅगस्ट २०१९ रोजी जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. बरोबर ६ आॅगस्ट रोजी पुन्हा एकदा पंचगंगेने धोका पातळी ओलांडल्याने धास्ती वाढली आहे.