मुंबई महानगरातील आकडेवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे संकट तीव्र झालेले असतानाच दहा वर्षांखालील लहान मुलांमध्येही कोरोना संसर्गाचा धाेका वाढताना दिसत असून, मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी २० टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे. तर महाराष्ट्रात १ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत एकूण ६०,६८४ लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून, यातील सुमारे ९,८८२ मुले ५ वर्षांखालील आहेत. परिणामी इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रिक्सनेही लहान मुलांमधील संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे.
लहान मुलांमधील संसर्गाचा धोका लक्षात घेऊन डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना योग्य ते साहाय्य करावे या व अशा अनेक मुद्द्यांवर जोर दिला जात आहे. या समस्येकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अशी विनंती खासदार राहुल शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
* देशातील ५ राज्यांत ७९,६८८ मुले बाधित
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या आकडेवारीनुसार देशभरातील ५ राज्यांमध्ये एकूण ७९ हजार ६८८ मुले कोरोनाबाधित झाली आहेत. छत्तीसगड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्लीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा अनुक्रमे ५,९४०, ७,३२७, ३,००४ आणि २,७३३ इतका आहे. हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ११ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान ११ हजार ३४४ कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली.
----------------------------