Join us

मुंबई महानगर क्षेत्रालाही संपाची झळ; सणानिमित्त बाहेर गेलेल्या नागरिकांना माेठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2021 7:24 AM

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई : एसटी कामगारांनी विलीनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी देण्याच्या मागणीसाठी संप सुरू आहे. रविवारी राज्यातील १२९ आगारांतील कामकाज बंद पडले. त्यात मुंबईतील आगारांचाही समावेश होता. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात दिवाळीच्या सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना याचा माेठा फटका बसला. बससेवा बंद असल्याने प्रवासी बस डेपाेमध्येच अडकून पडले होते.

मुंबई, ठाणे, पालघर, उरण या भागातील सर्वच डेपाेतील वाहतूक बंद झाल्याने या डेपाेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना एसटी संपाचा सर्वाधिक फटका बसला. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे १,३०० ते १,५०० फेऱ्या चालविण्यात येतात. यामध्ये मुंबई-पनवेल, दादर-पनवेल, उरण-दादर, मुंबई-भिवंडी, मुंबई-अलिबाग या मार्गावरील गाड्यांची वाहतूक बंद होती. सकाळी तुरळक प्रमाणात उरण डेपाेतून वाहतुक सुरू होती, परंतु १० नंतर तीही बंद करण्यात आली.

मुंबई विभागातील स्थिती 

  • परळ आगार सर्व वाहतूक चालू
  • कुर्ला आगार अंशतः वाहतूक चालू
  • उरण आगार अंशतः वाहतूक चालू
  • मुंबई सेंट्रल आगार वाहतूक बंद
  • पनवेल आगारातून सर्व वाहतूक बंद

एसटी महामंडळाला एका दिवसात १५ कोटींचा तोटा

विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सोमवारी २५० पैकी २४० आगार बंद होते. त्यामुळे या एका दिवसात एसटी महामंडळाला १५ कोटींचा  तोटा सहन करावा लागला आहे. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे  रविवारी ११९ आगार बंद होते, रविवारी मध्यरात्रीपासून संप आणखी तीव्र करण्यात आला सकाळी हा आकडा १२८ पर्यंत पोहोचला. तर दुपारपर्यंत राज्यातील २४० आगार बंद झाले. त्यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली होती. याचा परिणाम एसटीच्या तिजोरीवरही झाला असून सोमवारी अंदाजे १५ कोटींचे नुकसान झाले असे माहिती सूत्रांनी दिली. राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे.

टॅग्स :एसटी संप