Join us

मुंबईतल्या मेट्रोंचे कारशेड अधांतरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो - २ अ आणि मेट्रो - ७ चे काम वेगाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो - २ अ आणि मेट्रो - ७ चे काम वेगाने सुरू असून, या मेट्रोचे कारशेड येथेच म्हणजे पश्चिम उपनगरात असणार आहे. मात्र दुसरीकडे उर्वरित मेट्रो म्हणजे मेट्रो - ३, मेट्रो - ४ अ आणि मेट्रो - ६ च्या कारशेड बाबत अद्यापही सुस्पष्ट चित्र नसून, उर्वरित मेट्रोचे कारशेड नक्की कोठे असणार आहे? या प्रश्नावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मौन साधले आहे.

पर्यावरण अभ्यासक डी. स्टॅलिन यांच्याकडील माहितीनुसार, कांजुर येथील मेट्रो कारशेडचे काम थांबले आहे. पण पिलर बाहेरपर्यंत आले आहेत. शिवाय मेट्रो - ६ पूर्ण रखडले. मेट्रो - ६ च्या लाईनचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. ट्रॅक टाकायचा राहिला आहे. पण आता मेट्रो कारशेडच उभे राहिले नसल्याने मेट्रो - ६ चा खर्च वाया जात आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा मेट्रो - ६ साठी याचा विचार केला तेव्हा मिठागरे विभाग काहीच बोलले नाही. मात्र आता मिठागरे विभागाने कारशेडच्या जागेवर दावा केला. शिवाय नियोजनामध्ये कारशेड येथेच असल्याने सरकारने दुसरी जागा शोधलेली नाही. कोणीही या जागेवर दावा करत आहे. मेट्रो - ३ बाजूला राहू द्या. मेट्रो - ६ चा हिशोब कोण करणार. बाकीच्या मेट्रोचे कारशेड देखील येथेच होते. मात्र सगळयाच मेट्रो या एका कारणामुळे रखडल्या आहेत. उर्वरित मेट्रोची कारशेड कुठे आहेत? याची उत्तरे यंत्रणांनी द्यावीत.

कांजुरच्या जागेवर केंद्राचा दावा

पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेले रोहित जोशी यांच्या म्हणण्यानुसार, मेट्रो - ३ च्या कारशेडबाबत आजही पुरेशी स्पष्टता नाही. गोरेगाव पहाडी येथेही कारशेड होत नाही हे सरकारला कळले आहे. कांजुरच्या जागेवर केंद्राने दावा सांगितला आहे. आता राज्यालाही येथे काहीच करता येत नाही. आता कांजुर येथील काम थांबले आहे. मेट्रो - ६ चे काम सुरू असेपर्यंत या जागेवर दावा करण्यात आला नाही. मेट्रो - ३ आली आणि दावा केला गेला. येथे प्राधिकरणाची जी पाटी लागली होती त्यावर मेट्रो - ४ अ, मेट्रो - ६ आणि मेट्रो - ३ चे असे एकत्रित कारशेड असणार आहे, असा उल्लेख होता. मात्र आता सगळेच काम थांबले आहे. थोडक्यात मेट्रो कारशेडचा तिढा कायम आहे.