मुंबई, दि. 26 - मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, यासाठी मुंबई मेट्रोनं आणखी एक आधुनिक सुविधा प्रवाशांसाठी आणली आहे. मेट्रोच्या प्रवाशांमागील तिकीट रांगांची कटकट कमी व्हावी, यासाठी मुंबई मेट्रो प्रशासनानं मोबाइल तिकीटांचा नवीन पर्याय प्रवाशांसाठी आणला आहे. यामुळे घरबसल्याच मेट्रोचं तिकीट काढून 'क्यू आर कोड' तंत्रज्ञानाने स्थानकावर स्कॅन करून तुम्हाला प्रवास करता येणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
मेट्रोवरही 1 रुपयात उपचारदरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईतील सात रेल्वे स्थानकांवर यशस्वीपणे 1 रुपयात वैद्यकीय सेवा दिल्यानंतर आता मेट्रो स्थानकांवरही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. मेट्रो स्थानकावर चिकित्सालये सुरू करण्याबाबत मेट्रोच्या व्यवस्थापकांनी ‘मॅजिकदिल’ या संस्थेला विचारणा केली होती. येत्या महिनाभरात मेट्रो स्थानकावरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
दीड महिन्यांपूर्वी घाटकोपर स्थानकाशेजारी 1 रुपयात वैद्यकीय सेवा देणारे चिकित्सालय सुरू करण्यात आले होते. यानंतर दादर, कुर्ला, मुलुंड, वडाळा रोड, ठाणे व मानखुर्द या रेल्वे स्थानकावर ही चिकित्सालये व शेजारीच औषधांची दुकाने सुरू झाली.