मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना मुंबईकरांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. मुंबई मेट्रो(Mumbai Metro) च्या दोन मार्गावरील काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो २ ए चं काम पुढील ३-४ महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात या मार्गावर मुंबईकरांना मेट्रो प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवास यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सुलभरित्या प्रवास करता येणार आहे.
मुंबई मेट्रो ७ म्हणजे रेडलाइन आणि मेट्रो २ ए येलो लाइनचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दोन्ही मार्गावरील टेस्टिंगचं काम अखेरच्या टप्प्यात आहे. मुंबईच्या विविध स्टेशनवर काम पूर्ण होत आलं आहे. MMRDA आयुक्त एस. श्रीनिवास यांनी दिलेल्या मुलाखतीत ऑक्टोबरपासून जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पुढील ३-५ महिन्यात या दोन्ही मार्गावरील मुंबई मेट्रोची सुविधा सर्वसामान्यांसाठी खुली होणार असल्याचं म्हटलं आहे.
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रवाशांना मिळणार वाहतूक कोंडीतून दिलासा
मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व साडे सोळा किलोमीटर लांब असलेला मेट्रो मार्ग आहे. या मार्गावर एकूण १३ मेट्रो स्टेशन्स आहेत. हा मार्ग वेस्टर्न एक्सप्रेसवेवर तयार करण्यात आला आहे. ही मेट्रो सुरु झाल्यानंतर वेस्टर्न एक्सप्रेस वे मध्ये वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या परिसराच्या आसपास राहणाऱ्या लोकांसाठीही एक वेगवान प्रवासाचा आनंद मिळणार आहे. या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांना जलदगतीने अंधेरी ते दहिसर प्रवास करणं शक्य होणार आहे.
डी. एन नगर ते दहिसर प्रवाशांना मिळणार लोकल प्रवासाला पर्याय
मेट्रो २ ए डी. एन. नगर ते दहिसर एकूण साडे अठरा किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. या मेट्रो मार्गावर एकूण १७ मेट्रो स्टेशन आहेत. सध्याच्या घडीला मुंबई लोकल मार्गापासून दूर असलेल्या लिंक रोडवर हा मेट्रो प्रकल्प आहे. हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर १७ मेट्रो स्टेशनच्या आसपास राहणाऱ्या लाखो प्रवाशांना वेगवान प्रवास करणं शक्य होणार आहे. तसेच मुंबई लोकलच्या गर्दीतून लोकांची सुटका होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन ऑक्टोबर २०१५ मध्ये झालं होतं. तर प्रत्यक्षात कामाची सुरुवात २०१६ मध्ये करण्यात आली. आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे लवकरच या मार्गावर मेट्रो धावणार आहे.