भारतीय सैन्य बांधणार एलफिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रिज, 5 नोव्हेंबरपासून सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 08:55 AM2017-10-31T08:55:01+5:302017-10-31T12:59:12+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज एलफिन्स्टन स्थानकाची पाहणी केली. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमणदेखील उपस्थित होत्या.
मुंबई - एल्फिन्स्टन - परळ स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला होता. फूटओव्हर स्थानकांवरील अरुंद ब्रिजमुळे गैरसोय होत असल्याची तक्रार अनेक प्रवाशांना केली होती. दरम्यान एल्फिन्स्टन स्थानकावरील फूटओव्हर ब्रिजचा प्रश्नही समोर आला होता. यावर तोडगा काढण्यासाठी हा ब्रिज भारतीय सैन्यांकडून बांधला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज एल्फिन्स्टन स्थानकाची पाहणी केली. यावेळी ही घोषणा करण्यात आली. 5 नोव्हेंबरपासून भारतीय सैन्य फूटओव्हर ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात करणार आहे. 31 जानेवारीपर्यंत पुलाचं बांधकाम पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
भारतीय सैन्यातील इंजिनीअरिंग विंग आपत्कालीन परिस्थितीत अशाप्रकारचे ब्रीज बांधते. कमीत कमी वेळात मिलिटरीकडून हा ब्रिज बांधला जाईल. यापूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीत पूल कोसळल्यानंतर मिलिटरीने तो लवकरात लवकर बांधून दिला होता.
Mumbai: Railway Minister Piyush Goyal & Defence Minister Nirmala Sitharaman visit the site of #Elphinstone stampede pic.twitter.com/p3ObwJdKz4
— ANI (@ANI) October 31, 2017
Mumbai: Maharashtra CM Devendra Fadnavis also present at the site of #Elphinstone stampede pic.twitter.com/c3GStSt7i2
— ANI (@ANI) October 31, 2017
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना निवेदन दिलं होतं. एल्फिन्स्टन, दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे यासारख्या स्टेशनवर, फूट ओव्हर ब्रिज वापरणा-या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकदाच पण कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली होती.
— ashish shelar (@ShelarAshish) October 30, 2017
एल्फिन्स्टन- परळ पुलावर 29 ऑगस्ट रोजी सकाळी नेमकं काय घडलं?
- सकाळी 9.30 च्या सुमारास पावसाची मोठी सर आली.
- त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या.
- त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलावर गर्दी झाली.
- त्याचवेळी पत्रा कोसळल्याचं सांगण्यात आलं.
- गर्दीच्या वेळी मोठा आवाज झाल्याच्या गैरसमजातून धावपळ सुरु झाली.
- ब्रिज पडत असून शॉर्ट सर्किट झाल्याची अफवा पसरली, लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडू लागले
- एकमेकांना तुडवत लोकांची धावपळ सुरु झाली
- सकाळी 9.30 च्या सुमारास थेट जखमी आणि मृतांचा आकडा समोर आला. तिघांचा मृत्यू.
- जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
- काही मिनिटांतच मृतांचा आकडा वाढत गेला
मुसळधार पावसामुळे झाली दुर्घटना, रेल्वेकडून अधिका-यांना क्लीन चिट
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन झालेल्या दुर्घटनेसाठी चौकशी समितीने मुसळधार पावसाला जबाबदार ठरवलं होतं. रेल्वे अधिका-यांना याप्रकरणी क्लीन चिट देण्यात आली होती. एलफिन्स्टन - परळ रेल्वे ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला होता. पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दुर्घटनेची चौकशी करण्यात आली. चौकशी पुर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार यांच्याकडे अहवाल सोपवण्यात आला. तपास करत असताना जखमी झालेल्या 30 प्रवाशांचा जबाब नोंदवण्यात आला होता. यासोबत दुर्घटनेच्या व्हिडीओचीही तपासणी करण्यात आली अशी माहिती अधिका-यांनी दिली होती.
अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे चेंगराचेंगरी झाली. मुसळधार पावसामुळे आधीच पाय-यांवर गर्दी झाली असताना तिकीट खिडकीजवळ असणा-या प्रवाशांनीही बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु केला होता. प्रवाशांची संख्या वाढत असल्या कारणाने स्थानकावरील गर्दी वाढू लागली होती. जड सामान घेऊन जाणा-या प्रवाशांचा तोल सुटल्याने चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली.