एका मिनिटांत मुंबई; मेट्रो प्रवास सुपरफास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:05 AM2021-03-08T04:05:39+5:302021-03-08T04:05:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोची कामे वेगाने पूर्ण होत असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रोची कामे वेगाने पूर्ण होत असून, या दोन्ही मेट्रो मे किंवा जून महिन्यात प्रवाशांच्या सेवेत धावतील. या दोन्ही मेट्रोंमुळे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येईल. तर २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणत: २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे.
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मेट्रो कामाचा एक भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) मेट्रोच्या २ अच्या ओव्हरहेड वायरिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. तर चारकोप आगारात एकत्रित ६ डब्यांच्या ट्रेनची डायनॅमिक कमी गतीमध्ये ५२० मीटर अंतराची चाचणी घेण्यात आली असून दुसरा ट्रेन संच आल्यानंतर रेल्वेची सिग्नलिंगसह एकत्रित समांतर चाचणी सुरू होईल.
स्वदेशात डिझाईन आणि विकसित केलेल्या चालकविरहित मेट्रोची निर्मिती भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या बंगळुरू कॉम्प्लेक्समध्ये केली जात असून, प्राधिकरणच्या मेट्रो प्रकल्पासाठी चालकरहित मेट्रो गाडीचे उद्घाटनही नुकतेच करण्यात आले आहे. आजघडीला प्राधिकरणाच्या प्रकल्पात ६३ टक्के स्वदेशी सामग्री असून येत्या दोन-तीन वर्षांत हे प्रमाण ७५ टक्क्यापर्यंत वाढवण्यात येईल.
पहिल्या सहा ट्रेन येत्या सहा महिन्यांत दाखल होतील. त्यानंतर दर महिन्याला तीन याप्रमाणे उर्वरित ट्रेन पुढील तीन वर्षांत येतील. प्रत्येत ट्रेन ६ कोचची आहे. ३७८ कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील. कोचमध्ये ५२ प्रवाशांची आणि ३२८ प्रवाशांना उभे राहण्याची व्यवस्था आहे. एका डब्यात ३८० जणांचा प्रवास शक्य आहे. एका ट्रेनची प्रवासी क्षमता २२८० आहे. कोचच्या निर्मितीसाठी एकूण ३०१५ कोटी खर्च येत आहे. मेट्रोच्या प्रत्येक कोचसाठी ८ कोटी खर्च झाले आहेत. एकूण कोचची संख्या ५७६ पर्यंत वाढणार आहे.
मुंबई महापालिकेच्या सिटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कर्मचाऱ्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार मेट्रोच्या गरजांना अनुसरून हा प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. मेट्रो स्थानकांमध्ये आरोग्यविषयक किंवा आगीसारखी आपत्ती उद्भवल्यास त्यावर प्रथमोपचार तसेच अग्निशमन उपाययोजनांसह त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व कर्मचारी तयार असून, यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
---------------------
मेट्रो २ अ : दहिसर पूर्व ते डीएन नगर
लांबी : १८.५ किमी
खर्च : ६ हजार ४१० कोटी रुपये
१६ स्थानके : आनंद नगर, ऋषी संकुल, आयसी कॉलनी, एक्सर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीरनगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूरनगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्रीनगर आणि डीएन नगर
---------------------
मेट्रो ७ : अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व
लांबी : १६ किमी
खर्च : ६ हजार २०८ कोटी रुपये
१३ स्थानके : दहिसर (पूर्व), ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व)
---------------------
वैशिष्ट्ये
चालकविरहित
ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टीम
प्रत्येक बाजूला चार दरवाजांची स्टेनलेस स्टील बॉडी
प्रवाशांना सायकलसह प्रवास करणे शक्य.
---------------------
मेट्रोत काय आहे?
मेट्रो कोच एसी आहेत.
दरवाजे स्वयंचलित आहेत.
प्रत्येक डब्यात फायर फायटिंग यंत्रणा आहे.
सीसीटीव्हीची नजर आहे.
प्रवाशांना मदतीसाठी डब्यात स्विच आहे.
प्रत्येक डब्यात दोन सायकल ठेवण्याची व्यवस्था आहे.
ट्रेनची कमाल वेग मर्यादा ८० किमी प्रति तास आहे.
मेट्रो स्वयंचलित पद्धतीने धावणार आहे.
इंटरनेटसाठी ऑप्टिकल फायबरचे नेटवर्क आहे.
ऊर्जा संवर्धनाला प्राधान्य देण्यात आले आहे.
पर्यायी अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
---------------------
प्रशिक्षण
स्टेशन कंट्रोलर्स आणि ट्रेन ऑपरेटर्स यांना सिम्युलेटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण
एललटीएमटी ॲकॅडमी, हैदराबाद येथे सिम्युलेटर ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण स्टेशन कंट्रोलर्स, ट्रेन ऑपरेटर्स यांना दिले जात आहे.
मेट्रो परिचालनाचे विविध तंत्र शिकविले जात आहे.
लिफ्ट, स्पीड टेस्ट आणि एस्कलेटर स्कर्ट फिक्सिंगचीअंतर्गत तपासणी केली जात आहे.
मेट्रो गाड्यांच्या पॉवरिंगसाठी ओएचई देखभालीचे प्रशिक्षण दिले जात आहे.
ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन प्रक्रिया समजून घेण्यासाठी साइटवर टीम प्रशिक्षण घेत आहे.
हैदराबाद येथे रोलिंग स्टॉक जॉब प्रशिक्षण आणि फर्स्ट रिस्पॉन्डर प्रशिक्षण दिले जात आहे.
चारकोप मेट्रो डेपो येथेही प्रत्यक्ष साईटवर प्रशिक्षण सत्रे सुरू आहेत.
मेट्रो सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा होईल याची खात्री करण्यासाठी मेंटेनन्स टीम प्रशिक्षण घेत आहे.
चारकोप मेट्रो डेपो येथे ट्रॅक्शन पॉवर प्रदान करण्यासाठी रिसीव्हर सबस्टेशन (आरएसएस) बसविण्यात आले.