मुंबई काही मिनिटांत; मेट्रो स्टेशन्स सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:06 AM2021-03-18T04:06:19+5:302021-03-18T04:06:19+5:30
मेट्रो २ अ, सातच्या कामांचा वेग वाढला; मार्गिकेचेे काम अंतिम टप्प्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर प्रदेश ...
मेट्रो २ अ, सातच्या कामांचा वेग वाढला; मार्गिकेचेे काम अंतिम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७च्या कामाचा वेग आणखी वाढला आहे. आता तर स्थानकांचे काम वेगाने होत असतानाच येथील मेट्रोच्या चाचणीलादेखील वेग येत आहे. या सर्व घडामोडींवर प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव स्वत: लक्ष ठेवून असून, मेट्रो लाइन २ अ आणि लाइन ७च्या प्रत्येक स्टेशनवर स्थापन करण्यात येणाऱ्या युटिलिटीजच्या नव्या संचाची त्यांनी तपासणी केली.
मेट्रो स्टेशन्स सज्ज होत असून, ‘मुंबई काही मिनिटांत’ हे स्वप्नही साकार होत आहे, असा दावा आयुक्तांनी केला. मेट्रोच्या चाचण्या आणि वास्तविक मेट्रो प्रणाली शक्य तितक्या अखंडपणे कार्यरत राहील याची खात्री केली जात आहे. रोलिंग स्टॉक देखरेखीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण सत्रांची संख्या वाढविली आहे. चारकोप मेट्रो डेपोच्या रोलिंग स्टॉक्सच्या प्रत्येक मिनिटाच्या पैलूंचा आढावा घेतला जात आहे. डोअर सर्किटची तपासणी केली जात आहे. मेट्रोच्या चाचण्या सुरळीत पार पडण्यासाठी रोलिंग स्टॉक्स टीमच्या वतीने अत्यंत सावधगिरीने चाचणी घेण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसांत एमएमआरडीच्या वतीने १८.५ किमी लांबीच्या मेट्रो लाइन २ अ आणि १६.४ किमी लांबीच्या लाइन सातवर चाचणी सुरू करण्यात येणार असून, मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
* असे सुरू आहे काम
सर्वच कर्मचारी रोलिंग स्टॉकच्या मेंटेनन्ससंबंधी प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आगामी चाचण्यांबरोबरच संपूर्ण टीम सत्राद्वारे लाइव्ह मेट्रो ऑपरेशन्सचीही तयारी करीत आहे.
मेट्रोच्या सुखद अनुभवाकरिता व प्रवाशांच्या साेयीसाठी अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.
टिकाऊ वॉटर कूलर/कारंजे, फ्लॉवर पॉट्स, स्टील बेंच, रिसायकल डब्बे, इतर उपयुक्तता आणि सजावटीचा यामध्ये समावेश आहे.