मुंबई : मिठी नदी म्हटले की काळवंडलेले पाणी आणि दुर्गंधी असे चित्र समोर उभे राहाते. परंतु, आता मिठीचे हे रुपडे पालटू लागले असून, ही नदी सुंदर होतेय. इतकेच नाही तर या नदीत आता मासे दिसू लागले असून, पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील काही लाख लीटर पाण्याची गुणवत्ता वाढवून ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पवई भागात दररोज ८० लाख लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. यामुळे मिठीच्या पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
२६ जुलै २००५ च्या पावसानंतर पूरपरिस्थिती हाताळण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाची २००५ मध्ये स्थापना करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र व सत्यशोधन समितीच्या शिफारसींनुसार, दोन टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत व सेवा रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले होते.अशी होते मिठी नदीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया एका वाहिनीच्या ‘रोबोहोल’मधून हायड्रोलिक आणि गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने पाणी प्रकल्प स्थळाकडे नेले जाते. सुमारे ५९ ‘रोबोहोल’ (पूर्वीचा शब्द ‘मॅनहोल’) एकमेकांशी जोडले आहेत. सुरुवातीला सांडपाण्यासोबत आलेला कचरा वेगळा केला जातो. त्यानंतर पाण्यातील धातू किंवा अन्य प्रकारचे सूक्ष्म कण वेगळे केले जाते आणि शेवटी पाण्यातील दूषितपणा आणि दुर्गंधी दूर केली जाते.