Mumbai: महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे, आमदार अतुल भातखळकर यांचे आवाहन
By मनोहर कुंभेजकर | Published: February 18, 2023 03:59 PM2023-02-18T15:59:39+5:302023-02-18T16:00:13+5:30
Mumbai: महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे. स्वत:च्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने कांदिवली पूर्व विधानसभेत गेल्या काही वर्षांपासून आम्ही विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेत आहोत.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई - महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे. स्वत:च्या पायावर उभे राहावे, या उद्देशाने कांदिवली पूर्व विधानसभेत गेल्या काही वर्षांपासून आम्ही विविध प्रकारचे प्रशिक्षण वर्ग घेत आहोत. तेव्हा मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग व्यावसायिक दृष्टीकोनातून करायला हवा, असे प्रतिपादन स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केले.
कांदिवली पूर्वेच्या हनुमाननगर येथे स्पंदन सामाजिक प्रतिष्ठान, कोसिया आणि टिसा यांच्या संयुक्त विद्यमाने ॲडव्हान्स टेलरिंग, ब्युटीपार्लर आणि बेकरीचे प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप आणि बक्षीस वितरण समारंभात आमदार भातखळकर बोलत होते. यावेळी कोसियाचे निनाद जयवंत, डॉ. विद्या क्षीरसागर, सुधीर शिंदे उपस्थित होते.
महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्याने त्याचा वैयक्तिक तसेच कुटुंबालाही लाभ होतो. महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हाव्यात याच हेतूने आम्ही सुरुवातीपासून अशा प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करत आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशिक्षण वर्गातील उत्तमपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींचा आमदार भातखळकर यांच्या हस्ते बक्षीस देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणार्थी महिला, परिसरातील नागरिक उपस्थित होते.