मुंबई - मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेमध्ये तुफान राडा झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लोअर परळच्या पुलावर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये पूल पाहणीवरुन राडा झाला. यावेळी शिवसेनेचे सुनील शिंदे आणि मनसेचे संतोष धुरी आमनेसामने आले. दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेल्या लोअर परळचा पुलाची पाहणी करण्यासाठी गुरुवारी (26 जुलै) सकाळी शिवसेनेचे पदाधिकारी, नेते आणि रेल्वेचे अधिकारी तेथे दाखल झाले होते. यावेळी मनसे आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचेही कार्यकर्तेदेखील पुलावर दाखल झाले. यावरुन शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये वादाची ठिणगी उडाली. शिवसेनेच्या पाहणी दौऱ्यात मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला. आरोपानंतर सुनील शिंदे आणि संतोष धुरी यांच्यात बाचाबाची झाली. 'हा पूल पाहणी दौरा शिवसेनेचा आहे. यामध्ये अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी केली', असा आरोप शिवसेनेनं केला. यावेळी परिसरात प्रचंड गदारोळदेखील झाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
पुलावरील धोकादायक भाग लाल रंगानं दर्शवून बंद ठेवावा आणि उर्वरित पूल प्रवाशांना प्रवासासाठी वापरू द्यावा, असे रेल्वे अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान ठरवण्यात आले. यादरम्यान, मनसेच्या पदाधिका-यांनी रेल्वे अधिका-यांना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या गोंधळात शिवसेना आमदारांनी उडी घेतली. तेव्हा वादावादी सुरू झाल्याची माहिती समोर आली.
(...तर पूल उभारणीला दोन वर्षे लागणार!)
पादचाऱ्यांसाठी पूल खुला होणार?
दरम्यान, गेले दोन दिवस मुंबईकर प्रवाशांचे अतोनात हाल केल्यानंतर, लोअर परळ स्टेशनजवळील डिलाइल पुलाच्या दुरुस्तीबाबत महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बुधवारी (25 जुलै) तातडीची बैठक झाली. मात्र, पूल पाडून त्याच्या पुनर्बांधणीबाबत अद्याप दोन्ही प्राधिकरणामध्ये एकमत झालेले नाही. या असमन्वयाचा फटका नागरिकांना बसत असल्याने, गुरुवारी (26 जुलै) पाहणी केल्यानंतर हा पूल पादचा-यांसाठी खुला करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्टेशनजवळ ना. म. जोशी मार्ग (डिलाइल पूल) व गणपतराव मार्ग यांना जोडणारा पूल धोकादायक असल्याचे एका पाहणीतून समोर आले. त्यानंतर, हे पूल वाहतूक व पादचा-यांसाठी तत्काळ बंद करण्यात आला आहे.
मात्र, कोणतीही पूर्वसूचना व पर्यायी नियोजन न करता हा पूल बंद केल्याने गोंधळ उडाला आहे. या पुलावर चेंगराचेंगरीचा प्रसंग उद्भवत असल्याने, प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी आयुक्तांची भेट घेतली होती. दरम्यान,हा पूल बांधण्यास महापालिकेने यापूर्वीच स्पष्ट नकार दिला आहे.