मुंबई - मुंबईतील खड्डेयुक्त रस्त्यांविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेवरुन प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी मनसेनं मंत्रालयासमोरील रस्ता खोदून आंदोलन केलं. सोमवारी (16 जुलै) उशिरा रात्री मनसैनिकांनी आंदोलन केले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवलीमध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांविरोधात मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनाही व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे.
(डेडलाइन संपल्यानंतरही मुंबई खड्ड्यातच)
पीडब्ल्यूडी कार्यालयात खळ्ळ खट्याक
दरम्यान, सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात खळ्ळ खट्याक आंदोलन केले. आंदोलन करुनदेखील खड्डे बुजवले जात नसल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचलल्यानं पक्षाकडून सांगण्यात आले. याप्रकरणी पाच मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. गोरेगावमध्येही खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेनं महापालिकेच्या पी-दक्षिण विभाग कार्यालयावर संताप मोर्चा काढला होता.