दिल्लीत राबविणार कोरोना रोखण्याचे 'मुंबई मॉडेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:59 PM2021-06-09T21:59:26+5:302021-06-09T22:01:33+5:30

मुंबई महापालिकेच्या उपाययोजनांची देशपातळीवर दखल. दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी मुंबईचा केला अभ्यासदौरा.

Mumbai model to prevent corona to be implemented in Delhi bmc commissioner meeting | दिल्लीत राबविणार कोरोना रोखण्याचे 'मुंबई मॉडेल'

दिल्लीत राबविणार कोरोना रोखण्याचे 'मुंबई मॉडेल'

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई महापालिकेच्या उपाययोजनांची देशपातळीवर दखल.दिल्ली सरकारच्या प्रतिनिधींनी मुंबईचा केला अभ्यासदौरा.

मुंबई : कोविडचा प्रादुर्भाव रोखणे आणि बाधित रुग्णांवर मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांची दखल देश पातळीवर घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानेही गौरविलेल्या मुंबई मॉडेलचे धडे आता देशाच्या राजधानीत गिरवले जाणार आहेत. यासाठी दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी नुकताच मुंबईचा अभ्यास दौरा केला. यावेळी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी संबंधितांना सर्व माहिती दिली.

या दौऱ्यामध्ये दिल्ली सरकारच्या आरोग्य खात्याचे ज्येष्ठ अधिकारी डॉ. संजय अगरवाल आणि डॉ. धर्मेन्द्र कुमार यांचा समावेश होता. त्यांच्या चमूने या अभ्यास दौऱ्यादरम्यान मुंबई महापालिकेने केलेल्या विविध स्तरीय कार्यवाहीची माहिती घेतली. या अंतर्गत प्रामुख्याने 'वॉर्ड वॉर रूम'च्या माध्यमातून साध्य केलेले विकेंद्रीत व्‍यवस्‍थापन, रुग्णालयांच्या स्तरावर राबविले प्राणवायू व्यवस्थापन आणि अल्पावधीत उभारलेल्या जंबो रुग्णालयांची  माहिती घेतली. 

या प्रतिनिधींनी गोरेगाव येथील महापालिकेच्या जंबो कोविड केंद्र आणि अंधेरी परिसरातील सेव्हन हिल्स रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेतली. यावेळी एका विशेष बैठकीदरम्यान अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संगणकीय सादरीकरण केले. यावेळी आभार मानताना दिल्लीतही 'मुंबई मॉडेल' लवकरच राबविण्यात येणार असल्याचे दिल्ली प्रतिनिधींनी सांगितले.

दिल्ली पथकाने घेतलेली माहिती...

  • मुंबई महापालिका करीत असलेल्या कोविड रुग्ण व्यवस्थापन आणि खाटांचे वितरण समजून घेण्यासाठी 'डी' व 'के पूर्व' या दोन विभागांच्या 'वॉर्ड वॉर रूम'ना दिल्ली राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी भेट दिली. रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून, त्याचे समुपदेशन व त्याला रुग्णालयात खाट मिळवून देण्यापर्यंतच्या महापालिकेच्या व्यवस्थापनाची माहिती घेताना दिल्ली राज्य सरकारचे पथक भारावून गेले.
     
  • ऑक्सिजन व्यवस्थापनाची माहिती प्रत्यक्ष रुग्णालयात जाऊन प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. ऑक्सिजन पुरवठ्याचे अत्यंत काटेकोर नियोजन व व्यवस्थापन महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये साध्य कसे करण्यात येते त्या बाबत माहिती देण्यात आली.
     
  • अल्पावधीत उभारण्यात आलेल्या सहा जंबो कोविड रुग्णालयांमध्ये आठ हजार ९१५ खाटा असून चार हजारांपेक्षा अधिक मनुष्यबळ आहे. या रुग्णालयांच्या उभारणीबाबत व व्यवस्थापनाबाबत दिल्ली प्रतिनिधींना अत्यंत औत्सुक्य होते. मुंबईच्या धर्तीवर दिल्लीमध्ये जंबो रुग्णालये उभारण्यात येणार आहेत.
     
  • खासगी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभागातील सर्व खाटा आणि इतर खाटांपैकी ८० टक्के खाटांचे वितरण पालिकेच्या 'वॉर्ड वॉर रूम' द्वारेच करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची त्यांनी प्रशंसा केली. 
     

Web Title: Mumbai model to prevent corona to be implemented in Delhi bmc commissioner meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.