दक्षिण मुंबईतील कारमायल रोडवरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ एपीआय सचिन वाझे याची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी तळोजा कारागृहात सहा तास कसून चौकशी केली. खात्यात कार्यरत असताना मुंबईतील बार मालकांकडून केलेली हप्तावसुली आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली.
अखेरच्या टप्प्यात वाझेसोबत संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना समोरासमोर बसवून चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले. परमबीर सिंग यांनी वाझेला मुंबईतील बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करून देण्याचे टार्गेट देशमुख यांनी दिले होते, असा गंभीर आरोप केला होता, या प्रकरणाचा तपास गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून आतापर्यंत देशमुख आणि त्यांचे दोन पीए यांच्या भोवती सुरू होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची व्याप्ती वाढवून तत्कालीन आयुक्त आणि इतरांची जबाबदारी निश्चित करण्याची सूचना सीबीआयला केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्राथमिक अहवालावरून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेल्या ईडीने या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व स्फोटक कार आणि हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी वाझेकडे सविस्तर चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी न्यायालयाने तीन दिवस तुरुंगात जाऊन चौकशी करण्याची परवानगी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार आज सकाळी अधिकाऱ्यांचे एक पथक तळोजा तुरुंगात गेले. वाझेला बराकीतून भेट कक्षातील स्वतंत्र दालनात आणण्यात आले.
त्याने सीबीआयला दिलेल्या जबाबात डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ४.७० कोटी रुपये वसूल करून तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांच्याकडे पोहचल्याचे नमूद केले होते. त्यानुषंगाने त्याच्याकडून सविस्तर तपशील जाणून घेण्यात आला. ती रक्कम कोठून कशी घेतले, कोणाच्या हवाली केली याबद्दल जबाब नोंदवून घेण्यात आला. वसुलीबद्दल गृहमंत्री, आयुक्तांनी काय काय सूचना दिल्या होत्या याबाबत सायंकाळी चार वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर पथक कारागृहाबाहेर आले. उद्या पुन्हा त्याच्याकडे चौकशी केली जाणार आहे.
परमबीर सिंगांबद्दलही विचारणाईडीच्या अधिकाऱ्यांकडून वाझेकडे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंग यांच्याबद्दल विचारणा करण्यात आली. पैसे वसुलीला त्यांची संमती होती का, त्यांच्यासाठी वसुली केली होती, त्यांच्या कामाची पद्धती कशी होती, याबद्दल ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारणा केल्याचे समजते.