लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत मार्च महिन्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत गेला. मात्र, तरीही यंत्रणांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून यंत्रणा सज्ज केली आहे. मुंबईत सध्या १५ हजार ७९८ सक्रिय रुग्ण आहेत, त्यात १ हजार ७३ रुग्ण गंभीर अवस्थेत असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर ९ हजार ६०१ लक्षणविरहीत रुग्ण आहेत. ५ हजार १२४ रुग्णांमध्ये मध्यम व सौम्य प्रकारची लक्षणे आहेत.
मुंबईच्या एकूण पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण १०.८१ टक्के आहे तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ६५०हून अधिक दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत एकूण १५ हजार १६४ मृत्यू ओढावले आहेत, त्यात ५०हून अधिक वयोगटातील १३ हजार ४२ रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईतील २४ विभागांपैकी बी विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सर्वाधिक असून, ताे १ हजार ३३६ दिवसांवर पोहोचला आहे. त्याखालोखाल सी विभागात ९५४ दिवस, एम विभागात ८५६ दिवस आणि एन विभागात हा कालावधी ८३१ दिवसांवर आहे. तर एस विभागात म्हणजेच कुर्ला विभागात हा कालावधी सर्वात कमी म्हणजे ४६६ दिवसांवर आहे.
* असे झाले मृत्यू
मुंबईत नवजात बालक ते ९ वर्षांपर्यंतच्या १२ हजार ४९७ लहानग्यांना कोविड झाला आहे. त्यात ५५ टक्के मुले तर ४५ टक्के मुलींचा समावेश आहे. या वयोगटात आतापर्यंत २६ मृत्यू झाले आहेत तर ९०हून अधिक वयोगटातील २ हजार ५९५ व्यक्तींना कोविड झाला असून, त्यात ५४ टक्के पुरुष, ४६ टक्के महिला रुग्ण आहेत. या वयोगटात आतापर्यंत २३७ मृत्यू झाले आहेत.
--------------------------------