Join us

Mumbai: मामा आणि आजीच्या काळजाचा ठोका चुकला, बस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 12:36 PM

Mumbai: मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराच्या वरच्या खिंडीमध्ये मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन जाणारी खासगी बस २०० फूट दरीत कोसळून चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले. 

- गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात शिंग्रोबा मंदिराच्या वरच्या खिंडीमध्ये मुंबईचे ढोल-ताशा पथक घेऊन जाणारी खासगी बस २०० फूट दरीत कोसळून चालकासह १३ जण ठार झाले. तर, २९ जण जखमी झाले. मृतांमध्ये ३ तरुणींचा समावेश आहे. तसेच एका १२ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. वीर कमलेश मांडवकर (१२) हा चिमुकला आजोळी राहात होता. दुर्घटनेबाबत वृत्तवाहीन्यांमधून समजले आणि आजी, मामाच्या काळजाचा ठोका चुकला.   दुसरीकडे जुई दीपक सावंत(१८) हीच्या मृत्यूने गोरेगावच्या जलधारा एसआरए सोसायटीवर शोककळा पसरली. 

सुट्ट्या पडणार म्हणून सायकल विकत घेतलीगोरेगाव पूर्वच्या संतोष नगर परिसरात राहणारा वीर कमलेश मांडवकर (वय ८) हा लक्षधाम शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता. त्याची चुलत आजी मनाली मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे आई-वडील हे गावी रायगडला घर बांधायला गेले होते. त्यामुळे वीर हा त्याच्या आजोळी राहात होता. एकुलता एक त्यातच बोलण्यात चुणचुणीत आणि खेळात व अभ्यासात हुशार असलेल्या नातवावर त्याची सख्खी आजी निर्मला गणपत मांडवकर (६४) यांचाही भरपूर जीव होता. सुट्ट्या पडणार म्हणून त्याच्यासाठी त्यांनी नुकतीच एक सायकल देखील विकत घेतली होती. त्याच्या मामांनी शनिवारी सकाळी अपघाताबाबत कळवले. खोपोलीत बस पडल्याचे आम्ही बातम्यात पाहिले. वीरला आम्ही कायमचे गमावले, हे समजल्यावर आमच्या काळजाचा ठोकाच चुकला.

सोसायटीत पसरली शोककळा...गोरेगावच्या जलधारा एसआरए सोसायटीमध्ये २३ व्या मजल्यावर जुई दीपक सावंत (१८) ही तरुणी मोठी बहीण ग्रिष्मा, लहान भाऊ तसेच आई, वडील यांच्यासोबत  राहत होती. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जुईच्या आईला पॅरेलिसीसचा झटका आला होता. त्यामुळे त्या जाग्यावर असतात, तर वडील हे सुरक्षारक्षक असून, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. आम्हाला सकाळी व्हाॅट्स-ॲपवर या अपघाताची माहिती मिळाली आणि काही वेळानंतर स्थानिक पोलिसांनी सांगितले. जे समजल्यावर तिच्या वडिलांनी लगेचच खोपोलीच्या दिशेने धाव घेतली. दुसरीकडे या घटनेमुळे अख्ख्या सोसायटीत शोककळा पसरली आहे.

आई-बापाचा आधार गेलाअपघातात मृत्यू पावलेल्या तरुणांमध्ये सतीश श्रीधर धुमाळ (२५) आणि त्याचा सख्खा भाऊ स्वप्निल (१६) यांचा समावेश आहे.  हे दोघे भाऊ बीएमसी कॉलनीच्या बी वॉर्ड येथील एका खोलीत नुकतेच भाडेतत्त्वावर राहायला आले होते. यातील सतीश हा बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचा प्रमुख आहे. तो खासगी कंपनीत नोकरी करायचा, तर स्वप्निल हा कॉलेजात शिकत होता, असे स्थानिकांनी सांगितले. त्यांची आई सुजाता या २४ तासांसाठी घरकाम करायच्या आणि त्यातून सवड काढत मुलांना भेटायला यायच्या. या अपघातात आई-बापाचा आधार कायमचा निघून गेला त्यामुळे स्थानिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सुपारी ठरली शेवटची! मुंबई : गणेशोत्सव असो वा कोणतीही मिरवणूक असो नेहमी प्रत्येक कार्यक्रमात पुढे असलेले बाजीप्रभू ढोल ताशा पथकाला पुणे पिंपरी परिसरात मोठ्या कामाची सुपारी मिळाली होती. जी अखेरची ठरेल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी ऑर्डर मिळाली होती. ती मोठी सुपारी असल्याने त्यासाठी जवळपास ४० ते ५० जणांना यासाठी एकत्र करण्यात आले होते. गोरेगावच्या नागरी निवारा परिषद या ठिकाणी सकाळी खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने हे वादक एकत्र निघाले. कार्यक्रम  उरकल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास मुंबईला येण्यासाठी ही मुले निघाली. मात्र काळाने रस्त्यातच त्यांच्यावर घाला घातला. ज्या ट्रॅव्हल्सच्या बसने या मुलांचा अपघात झाला त्यांनी अद्याप कोणतीही विचारणा केलेली नाही, असे माजी नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी सांगितले. सर्वांचे मृतदेह मुंबईसाठी रवाना करण्यात आलेले असून, यश यादव, कृतिक लोहित आणि राहुल गोठल यांचा मृतदेह ट्रॉमाकेअरच्या शवागृहात ठेवला जाणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

बोरघाटात झालेल्या अपघातातील जखमींची नावेआशिष विजय गुरव (१९, दहिसर), यश अनंत सकपाळ (१७, गोरेगाव), जयेश तुकाराम नरळकर (२४, कांदिवली), वृषभ रवींद्र कोरमे (१४, गोरेगाव), रुचिका सुनील डुमणे (१७, गोरेगाव), आशिष विजय गुरव (१९, दहिसर), ओंकार जितेंद्र पवार (२५, खोपोली), संकेत चौधरी (४०, गोरेगाव), रोशन शेलार (३५, मुंबई), विशाल अशोक विश्वकर्मा (२३ गोरेगाव), निखिल संजय पारकर (१८, मुंबई), युसूफ मुनीर खान (१३, मुंबई), कोमल बाळकृष्ण चिले (१५, सांताक्रूज), अभिजित दत्तात्रेय जोशी (२०, गोरेगाव), मोहक दिलीप सालप (१८, मुंबई), दीपक विश्वकर्मा (२०, गोरेगाव), सुरेश बाळाराम अरोमुक्कंम (१८, गोरेगाव), नम्रत रघुनाथ गावनुक (१८, गोरेगाव),  चंद्रकांत महादेव गुडेकर (२९ गोरेगाव), तुषार चंद्रकांत गावडे (२२, गोरेगाव), हर्ष अर्जुन फाळके (१९, विरार), महेश हिरामण म्हात्रे (२०, गोरेगाव,), लवकुश रणजित कुमार प्रजापती (१६, गोरेगाव), शुभम सुभाष गुडेकर (२२, गोरेगाव, मुंबई), ओम मनीष कदम (१८, गोरेगाव), मुसेफ मोईन खान (२१, गोरेगाव), सनी ओमप्रकाश राघव (२१, खोपोली)

टॅग्स :अपघात