Join us

Mumbai: मराठी भाषेला मिळणार अभिजात भाषेचा दर्जा, खासदार गोपाळ शेट्टींनी व्यक्त केला विश्वास

By मनोहर कुंभेजकर | Published: July 29, 2023 12:21 PM

Gopal Shetty: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय लवकर केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय घेईल. त्यामुळे एक चांगला संदेश महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठी भाषिकांपर्यंत जाईल असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - मराठी ही १००० वर्ष जुनी भाषा असून २०११ च्या जनगणना अनुसार भारतात ९ कोटी नागरिक मराठी भाषिक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ७४५ लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे.जगभरात मातृभाषा म्हणून मराठी भाषेचा  उपयोग करणाऱ्यां नागरिकांच्या संख्येनुसार मराठी ही दहावी भाषा असून, भारतात मराठी भाषा तिसऱ्या क्रमांका वर आहे. या भाषेतील अनेक साहित्य कृती अतिशय महत्वपूर्ण आणि लोकप्रिय झाली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक आदरणीय कुसुमाग्रज यांच्या वाढदिवस दरवर्षी दि,२७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा होतो.मात्र आजही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही. त्यामुळेमराठी भाषेला लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी करत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी दि, २८ एप्रिल रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी.किशन रेड्डी यांना स्मरण पत्र दिले होते.

यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या विचाराधीन असून यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे पत्र केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना दि,२४ जुलैला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.लोकमतने सुद्धा याबाबत सातत्याने वृत्त देत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी आपण २०१५ पासून सातत्याने प्रयत्न करत असून १० फेब्रुवारी २०२०, ऑगस्ट २०२१, नोव्हेंबर '२१  मध्ये तारांकित, अतारांकित प्रश्न लोकसभेत विचारले होते. तत्कालीन संस्कृती राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंह पटेल यांची भेट घेऊन त्यांना देखिल पत्र दिले होते. मराठी भाषा अभिजात भाषेचा दर्जा संदर्भात समिती गठीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते.

मात्र अजूनही मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळालेला नाही. असे त्यांनी मंत्रीमहोदयांना पत्रात नमूद केले होते, अशी माहिती खासदार शेट्टी यांनी लोकमतला दिली. मराठी  भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय लवकर केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय घेईल. त्यामुळे एक चांगला संदेश महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठी भाषिकांपर्यंत जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :मराठीमहाराष्ट्रगोपाळ शेट्टी