मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंमलबजावणीसाठी चक्क खासदाराने दिले राज्यपालांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 06:28 PM2021-08-26T18:28:16+5:302021-08-26T18:29:08+5:30
झोपडपट्टीधारकांना हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी न्याय मिळावा म्हणून करण्यात आली विनंती.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईतील गोरगरीबांना तसेच झोपडपट्टीधारकांना आपले हक्काचे पक्के घर मिळावे आणि झोपडपट्टीमुक्त मुंबईकरण्याची उपाय योजना कार्यान्वित करण्यात यावी यासाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी निवेदन देत मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी तसेच पहिला मजल्यावर राहणाऱ्या झोपडपट्टीधारकांना २०१७ जीआर प्रमाणे आपले हक्काचे पक्के घर मिळण्यासाठी लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून विनंती केली आहे.
यावेळी राज्यपालांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून लवकरच या विषयावर योग्य निर्देश देण्याचे आश्वासनही दिले. तसेच प्रधान सचिव गृहनिर्माण, एसआरए चे सीईओ आणि महानगरपालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश देईन असे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई भाजप मुंबई सचिव डॉ. योगेश दुबे उपस्थित होते.
"२०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी नवीन जीआर काढला होता. सदर जीआरची अंमलबजावणी व्हावी म्हणून खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला. फक्त समित्या नेमल्या गेल्या. मात्र अजूनही मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी झाली नाही," अशी खंत त्यांनी लोकमतकडे व्यक्त केली.