अशी मुंबई-तशी मुंबई, भविष्यात कशी असावी मुंबई?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 06:15 AM2018-12-16T06:15:14+5:302018-12-16T06:15:30+5:30

सुलक्षणा महाजन गेल्या वर्षभरात ‘अशी मुंबई तशी मुंबई’ ह्या ‘लोकमत’च्या सदराने मला पन्नास वर्षांमध्ये झालेल्या बदलांचा विचार करण्याची आणि ...

Mumbai like Mumbai, how should Mumbai be in the future? | अशी मुंबई-तशी मुंबई, भविष्यात कशी असावी मुंबई?

अशी मुंबई-तशी मुंबई, भविष्यात कशी असावी मुंबई?

Next

सुलक्षणा महाजन

गेल्या वर्षभरात ‘अशी मुंबई तशी मुंबई’ ह्या ‘लोकमत’च्या सदराने मला पन्नास वर्षांमध्ये झालेल्या बदलांचा विचार करण्याची आणि माझे विचार, अनुभव तसेच चिंता व्यक्त करण्याची संधी दिली. पन्नास वर्षांपूर्वी शिक्षणासाठी आल्यावर दिसलेली मुंबई आणि आता ५० वर्षांपेक्षा जास्त काळ वास्तू आणि नगररचना व्यवसायात काम केल्यावर दिसणारी मुंबई यात झालेले काही बदल आणि निरीक्षणे मांडता आली. तसेच मुंबईने मला काय काय दिले याचाही मागोवा घेता आला.

पन्नास वर्षांच्या काळात शहराच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप पूर्णत: बदलले तरी मुंबई आणि लोकांचे स्थलांतर हे समीकरण काही बदलले नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढी अस्तंगत झाली. त्यानंतर मुंबईच्या दोन पिढ्या वाढल्या. त्यात स्थलांतरित लोकांची भर पडली. उद्योग आणि लोकसंख्या ह्यामुळे शहराचा प्रादेशिक विस्तार झाला. शहराचे एककेंद्री स्वरूप जाऊन ते बहुकेंद्री झाले. महानगरीचे स्वरूप गुंतागुंतीचे नागरी-अर्धनागरी-ग्रामीण असे झाले. मूळची, ब्रिटिश काळात लहान लहान बेटे एकत्र करून घडलेली आणि स्वातंत्र्यानंतर घडलेली मुंबई यात जमीन-अस्मानाचे अंतर पडले. महानगराची वाढ होत गेली त्याबरोबर मुंबईची आणि प्रदेशातील नव्या-जुन्या शहरांची वाढ होऊनही दुरवस्था
आणि बकाली वाढली. स्वातंत्र्य आले; पण प्रशासकीय सुव्यवस्था मात्र हरवली.

एकेकाळी मुंबई हे भारतामधील सर्वांत देखणे आणि आधुनिक शहर होते. मुंबईचे पोवाडे गाताना, तिचे वर्णन करताना कवींना आणि लेखकांना शब्द कमी पडायचे. तेव्हा गरिबांनाही ‘मुंबई मेरी जान’ म्हणावेसे वाटत असे. आताही मुंबईबद्दल भरभरून लिहिले जाते; पण त्यात कौतुक आणि आनंद नसतो, तर मुंबई शहराच्या भयंकर दुरवस्थेची वर्णने आणि चिंता असतात. तिला कोणी झोपडपट्ट्यांची राजधानी म्हणून हिणवते, तर कधी या ‘कमाल’ शहराची संभावना ‘क्षयरोगाची जागतिक राजधानी’ म्हणूनही केली जाते. मुंबईचा अभिमान आता क्वचितच दिसतो.
इतके स्थित्यंतर होऊनही स्थानिक राजकारण, अस्मिताबाजी आणि काल्पनिक रम्य भूतकाळ, यातच अडकलेले दिसते. एकेकाळी भारताला स्वतंत्र करण्याचे स्वप्न बघणारी मुंबई आता भविष्य बघण्याची, घडविण्याची राजकीय क्षमता आणि हिंमत हरवून बसली आहे. सत्तर वर्षांपूर्वी मुंबई ही व्यापार, मोठे-मध्यम आणि लहान उद्योग, वित्त, शिक्षण, आरोग्य, बांधकाम अशा बिगर शेती अर्थव्यवस्थेच्या आधारे वाढली होती. कापड, अभियांत्रिकी, वाहन, औषध उद्योग वाढत होते. तेव्हा येथे उद्योजक, डॉक्टर आणि बुद्धिजीवी लोकांचे नेतृत्व होते. आज ते अस्तंगत झाले आहे. तेव्हा मुंबईमध्ये संघटित आणि असंघटित कामगार संख्येने मोठे असले तरी नेतृत्व मात्र सुशिक्षित, विचारी, स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या अभिजनांचे असे. असे नेते शहराचा आणि नागरिकांच्या भल्याचा विचार करीत. स्वत:च्या खिशात हात घालून शहराचे सार्वजनिक वैभव वाढवीत. आता सार्वजनिक संपत्तीची लूट वाढली आहे. अशी स्वार्थाने आणि लोभाने बरबटलेली, विचाराने बुरसटलेली मुंबई भविष्य काळात किती काळ टिकेल ही चिंता आज सतावते आहे. शहराचे टिकाऊपण नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक तसेच भौतिक सेवांच्या जाळ्यातून गुंफले जात असते. शहराचे रस्ते, रेल्वे आणि वाहतूक सेवा शहरातील जमिनीवरील व्यवहार तोलून धरत असतात. पायाभूत सेवा भक्कम आणि टिकाऊ असणे म्हणजे शहर दीर्घायुषी करणे. ते केवळ प्रभावी नियोजनातून घडत असते. रेल्वे आणि बेस्ट सेवा नसती तर मुंबई घडली नसती. पाणी - मैलापाणी व्यवस्था, संपर्क आणि संवाद माध्यमांच्या साधनांचे जाळे जर नसते तर मुंबईची संपत्ती वाढली नसती. ‘अशी मुंबई तशी मुंबई’ सदरातून मुंबईच्या अशा बदलत्या, वैविध्यपूर्ण स्वरूपाचा धांडोळा मी घेतला. वाचकांनीही त्याला दाद दिली. पण आता खरी गरज आहे ती गत काळात अडकून न पडता भविष्याकडे बघण्याची आणि ते घडविण्यासाठी झटण्याची. दुर्दैवाने ‘ती मुंबई छान होती’ असे आता फक्त गत काळातील आठवणी काढतानाच म्हणता येते. आता ‘अशी नसावी मुंबई’ असे म्हणावेसे वाटते. यापुढे मात्र ‘कशी असावी आणि कशी सुधारावी मुंबई?’ याचा विचार केला नाही, तर मुंबईचा ºहास अटळ ठरेल. त्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा आणि त्यात नागरिकांना, वाचकांना आणि विविध तज्ज्ञांना सामील करून घ्यावे असे सुचवावेसे वाटते. सुदैवाने तसा विचार करणारे आणि मुंबईवर प्रेम करणारे अजून लोक अनेक संस्थांमध्ये आहेत. मुंबईचे वर्तमान आणि वास्तव तेच कदाचित बदलू शकतील. (समाप्त)
 

Web Title: Mumbai like Mumbai, how should Mumbai be in the future?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई