अशी मुंबई-तशी मुंबई, मरिन ड्राइव्ह आणि मोटारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 05:01 AM2018-11-12T05:01:48+5:302018-11-12T05:02:49+5:30
वास्तवात हे सर्व रस्ते मुख्यत: वाहतूक सुधारावी, म्हणून बांधले गेले असले, तरी समुद्राच्या भरतीचे पाणी वस्तीमध्ये शिरू नये, जमिनीची आणि किनाऱ्याची धूप होऊ नये,
मुंबईतील मरिन ड्राइव्ह म्हणजे राणीच्या गळ्यातला रत्नहार. या भव्य मार्गासारखी देखणी आणि आकर्षक दुसरी जागा मुंबईमध्ये शोधून सापडणार नाही. साधारण अशीच रचना आणि समुद्र असला, तरी वरळी किंवा वांद्रे येथील समुद्र किनाऱ्यांना मरिन ड्राइव्हसारखी शान नाही. अलीकडे वरळी-वांद्रे सागरी सेतूचे उंच मनोरे आणि त्याला जोडलेल्या केबलच्या साहाय्याने तोललेला मोठा देखणा पूल मुंबईच्या दृश्यांमध्ये दिसू लागला असला, तरी मरिन ड्राइव्हची सर त्याला नाही.
वास्तवात हे सर्व रस्ते मुख्यत: वाहतूक सुधारावी, म्हणून बांधले गेले असले, तरी समुद्राच्या भरतीचे पाणी वस्तीमध्ये शिरू नये, जमिनीची आणि किनाºयाची धूप होऊ नये, हा हेतूही महत्त्वाचा होता. व्यापार विस्ताराच्या काळात किनाºयावर भर घालून जमीन वाढविणे आणि त्याच्या विक्रीमधून प्रकल्पाचा खर्च वसूल करणे, ही तेव्हाच्या ब्रिटिश शासनाची रीतच होती. त्या काळीही प्रकल्प बांधणाºयांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, परंतु कालांतराने असे आरोप मुंबईकरांच्या विस्मृतीमध्ये गेले आहेत़ कारण मोकळ्या हवेत हिंडण्याचा, समुद्राच्या सानिध्याचा, तेथून संध्याकाळी मावळणारे लाल भव्य सूर्य बिंब बघण्याचा आनंद नागरिकांना गेली अनेक वर्षे घेतायेत. पुढील शतकातही तो कमी होणार नाही. वाद-विवाद मागे पडतात आणि यशस्वी प्रकल्प नागरिकांना शाश्वत आनंद देत राहतात, हे मात्र खरे.
१९७०च्या दशकात मी मरिन ड्राइव्हवरच्या मुलींच्या वसतिगृहात पाच वर्षे राहिले होते. त्या परिसराने मला मुंबईच्या प्रेमात पाडले होते. मुंबई बघायला येणारा कोणताही माणूस जेव्हा मरिन ड्राइव्ह बघतो, तेथे फिरतो, तेव्हा त्याच आठवणी मनावर कायमच्या कोरल्या जातात. त्या ठिकाणी राहिल्यानंतर तर त्या आठवणी अधिकच गहिºया होऊन राहिल्या तर नवल नाही.
बाल्कनीमध्ये उभे राहून खालच्या आठ मार्गिकांच्या रस्त्यावरून अथक वाहणाºया वाहनांचा प्रवाह बघणे हा आमचा छंद होता. त्या काळात मुंबईमध्ये केवळ अॅम्बेसिडर किंवा फियाट अशा दोनच प्रकारच्या गाड्यांची चालती असे. मात्र, तेव्हाच्या मरिन ड्राइव्हवर थोड्या श्रीमंती गाड्याही धावताना दिसत. इम्पाला, मर्सिडीज किंवा क्वचित रोल्स रॉईस अशा गाड्या त्यांच्या आकारामुळे, सौंदर्यामुळे आणि डौलदार चालीमुळे उठून दिसत. त्या काळातल्या मुंबईमध्ये अशा गाड्यांचे मालक सहसा मलबार हिल, पेडर रोड नाहीतर नेपियन सी रस्त्यावर राहणारे आणि फोर्ट विभागात कामाला जाणारे असत. संध्याकाळी मरिन ड्राइव्हवरून धावणाºया अशा गाड्यांची संख्या मोजणे हा आमचा टाइमपास असे. अर्ध्या तासात अशा पन्नास गाड्या सहज मोजल्या जात.
मरिन ड्राइव्हइतकेच तेव्हा मोटारींचेही आकर्षण मोठे होते. कारण तेव्हा मोटारी दुर्मीळ होत्या. सामान असेल, गरज असेल, तेव्हाच लोक टॅक्सीचा वापर करीत. मोटारीतून मरिन ड्राइव्ह अनुभवता येत नसे आणि त्याचा आनंद मिळत नसे. मरिन ड्राइव्हचा सर्वात जास्त आनंद मिळायचा, तो १२३ क्रमांकाच्या दुमजली बसच्या, वरच्या मजल्यावरच्या पहिल्या रांगेतील आसनावरून प्रवास करताना, तसेच पावसाळ्याच्या दिवसांत किनाºयावरून हिंडताना, उंच उसळणाºया लाटा अंगावर घेत भिजाताना. अलीकडच्या काळात दुमजली बसेस बेस्टच्या ताफ्यातून गायब झाल्यामुळे लोकांचा तो साधा आनंदही उरला नाही.
मरिन ड्राइव्हच्या रस्त्यावरून प्रवास करणे आता वेगवान राहिले नसले, तरी मुंबईच्या इतर भागातील तीव्र वाहतूककोंडीचा अनुभव येथे क्वचितच येतो. शिवाय आता महागड्या गाड्यांचे अप्रूप वाटण्याचा काळही मागे पडला आहे. आता अॅम्बेसिडर किंवा फियाट गाड्या तेथे क्वचितच दिसतात. इम्पाला गाड्याही आता केवळ सिनेमात दिसतात. मात्र, श्रीमंती मोटारींचे नवनवीन प्रकार आता मोठ्या प्रमाणात दिसले, तरी त्यांच्याकडे लक्ष जात नाही. समुद्रावरची मोकळी हवा तोंडावर घेत, त्यातून प्रवास करणे हे त्या गाड्यांचे मालक कधीच विसरले असतील. किंबहुना मुंबईमधील गाड्यांची संख्या आणि प्रत्येक चौरस्त्यावर होणारी वाहतूककोंडी आणि त्यामुळे होणारा मनस्ताप यामध्ये सर्व मुंबईकर हतबल झाले आहेत. मरिन ड्राइव्हच काय, परंतु आता कोणत्याही रस्त्यावरच्या गाड्या मनाला भुरळ घालत नाहीत, उलट आता त्यांची दहशत वाटायला लागली आहे! मोटारींनी आता मुंबईचा ताबा घेतला आहे आणि नागरिक बेदखल झाले आहेत.