-सुलक्षणा महाजनमुंबई. सर्व जगाचे लक्ष असलेली आर्थिक राजधानी. इथे अनेक घडामोडी घडत असतात. मुंबईतल्या पायाभूत सुविधांवर तर अनेकदा चर्चा होते. मात्र, सध्या ज्या वेगाने मुंबई बदलते आहे, त्या तुलनेत इथल्या लोकसंख्येला पुरेशा पायाभूत सुविधा संबंधित प्राधिकरणांनी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या कशा पद्धतीने मिळतील, त्यासाठी नेमके काय करावे लागेल, याचा आढावा घेणारे ‘अशी मुंबई तशी मुंबई’ हे सदर दर १५ दिवसांनी.मुंबई म्हणजे माझ्या प्रेमाचा-रागाचा, आनंदाचा-दु:खाचा, आशांचा-निराशांचा अभ्यासाचा-अनुभवाचा विषय. मुंबईच्या प्रेमामुळे जगातील सर्वच शहरे मला जवळची आणि आपली वाटतात. गेली ५० वर्षे मुंबईत राहूनही मुंबई समजली, असे मात्र अजूनही वाटत नाही. तरी ती आपली आहे ही भावना दिलासा देते. त्यामुळेच अशी मुंबई, तशी मुंबई याच्या जोडीनेच अशी-कशी ही मुंबई असेही सतत वाटत राहते.मुंबईचा सर्वात डोळ्यात भरणारा गुण म्हणजे येथील प्रचंड विरोधाभास. हा विरोधाभास डोळ्यांना दिसतो, कानांना ऐकू येतो, त्वचेला जाणवतो, नाकाला समजतो आणि जिभेला आंबट-गोड-तिखट चवींच्या आठवणी देतो. विरोधाभास हाच मुंबईचास्थायी भाव आहे. केवळ मुंबईचाच नाही, तर जगातील सर्वच महानगरांचा तो स्थायी भाव असतो. त्यामुळेच मुंबईत राहताना, हिंडताना, बसताना आणि उठताना मुंबई प्रत्येकाच्या मनात उलट-सुलट भावना निर्माण करते, म्हणूनच ती ग्रेट वाटते. मुंबई आकर्षित करते, तशीच ती दूरही लोटते. प्रेम, तसेच तिरस्कारही निर्माण करते. अनेकदा मुंबईतून पळून दूर जावेसे वाटते आणि दूर गेल्यावर मात्र मुंबईत कधी परत जातो, असे होऊन जाते.अशा या विरोधाभासाचा शोध अधिक तपशिलात जाऊन, विविध प्रसंग घडतात, तेव्हा घेतला जातो. अशा अनुभवांची उजळणी करायची, इच्छा अनेक दिवसांपासून मनात होती. ‘अशी मुंबई-तशी मुंबई’ या सदरातून ते मांडायचा मी प्रयत्न करणार आहे. बरोबर ५० वर्षांपूर्वी मी मुंबईमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला आले. तेव्हा आले आणि इतर अनेकांप्रमाणे मुंबईचीच होऊन राहिले. काही निमित्त घडले की, तेव्हाची मुंबई आजही डोळ्यासमोर येते. अनेक गोष्टी बदललेल्या दिसतात. तरीही अनेक गोष्टी तशाच राहिलेल्या दिसतात.त्यातील एक न बदलेली गोष्ट म्हणजे मुंबईची गर्दी! मुंबई जेव्हापासून शहर म्हणून नावारूपाला आले, तेव्हापासून गर्दी हा मुंबईचा सर्वात स्थायीभाव बनला आहे. नाशिकहून मुंबईला शिकायला आले आणि मरिन ड्राइव्हच्या सरकारी मुलींच्या वसतिगृहात राहू लागले. मुंबईच्याया सर्वात सुंदर भागात राहायला मिळणे, ही तेव्हा मोठी भाग्याचीच गोष्ट होती. तेथील निवास हीचसर्वात मोठी चैन वाटत असे. आजही ते वसतिगृह तसेच आहे. आम्हाला प्रत्येकीला ९० चौ. फूट क्षेत्रफळाची स्वतंत्र खोली असे. मात्र, आतात्याच खोलीत २ किंवा ३ मुली राहतात. नावही ‘सावित्रीबाई फुले वसतिगृह’ असे बदलले आहे. एकंदरीत मुंबईच्या गर्दीची आणि नाव बदलाची लागण त्या वसतिगृहालाही झाली आहे.वसतिगृहात राहत असताना, अनेकदा गिरगावात जाण्याची गरज पडत असे. काहीही खरेदी करायचे तर तेथेच जावे लागे. तेव्हा तेथे अनेक सिनेमागृहे होती. आम्हा मुलींना गावाकडच्या गप्पानंतर सिनेमा हे सर्वात महत्त्वाचे करमणुकीचे साधन होते. तेव्हा गिरगावात बहुतेक सर्व लोक दाटीवाटीने बांधलेल्या चाळींमध्येच राहात.मुंबईत गिरगावात किंवा गिरणगावात एका लहान खोलीत ५-१० माणसे राहात असत आणि आजही राहतात. मात्र, आजच्यापेक्षा तेव्हा गिरगावाची लोकसंख्या जास्त होती. त्यामुळे रस्ते, दुकाने, बाजार, नाटक आणि सिनेमागृहे नेहमी गर्दीने ओसंडून वाहत असत. त्यातच बेस्टच्या बसेस धावत. सुदैवाने तेव्हा मोटारी, दुचाक्या खूप कमी असल्यामुळे आणि रस्त्याच्या कडेला पदपथ असल्यामुळे, आकर्षक दुकाने बघत सहज चालता येत असे. दाटीवाटीत राहणा-या लोकांनाही गिरगाव चौपाटी आणि मरिन ड्राइव्हच्या रुंद पदपथावरून चालण्याची चैन अनुभवता येत असे. आज अनेक चाळी पाडून तेथे उंच इमारती आल्या आहेत. बहुतेक सिनेमागृहेदेखील बंद पडली आहेत. गिरगाव जरी तेव्हाचे राहिले नसले, तरी बटाट्याच्या चाळीने आणि त्या काळातील साहित्याने ते अक्षर रूपात प्रेमाने जपले गेलेआहे. आजचे बदललेले गिरगावमात्र, मराठी साहित्यात क्वचितच दिसते. गिरगावची मराठी संस्कृतीच बदलून गेली आहे. कमी-जास्त प्रमाणात संपूर्ण मुंबईतच हे घडले आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील ती मुंबई डोळ्यांदेखत काळाच्या उदरात गुडूप झाली आहे.
‘अशी मुंबई तशी मुंबई’....आकर्षण मुंबईचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 2:49 AM