Mumbai: झगमगाटाचा मुंबईकरांना बसणार जोरदार शॉक, पालिकेच्या वीजबिलात १५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 02:32 PM2023-04-16T14:32:37+5:302023-04-16T14:34:00+5:30

Mumbai News: मुंबई महापालिकेने काही महिन्यांपूर्वी मुंबई सौंदर्यीकरणाचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत शहरातील मुख्य चौक, रस्ते, उड्डाणपूल उजळविण्यासाठी पालिकेने विद्युत रोषणाई केली. मात्र, या झगमगाटाचा शॉक मुंबईकरांना बसणार आहे.

Mumbai: Mumbaikars will get a big shock due to lightning, 15 percent increase in the electricity bill of the municipality | Mumbai: झगमगाटाचा मुंबईकरांना बसणार जोरदार शॉक, पालिकेच्या वीजबिलात १५ टक्के वाढ

Mumbai: झगमगाटाचा मुंबईकरांना बसणार जोरदार शॉक, पालिकेच्या वीजबिलात १५ टक्के वाढ

googlenewsNext

 मुंबई : मुंबई महापालिकेने काही महिन्यांपूर्वी मुंबई सौंदर्यीकरणाचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत शहरातील मुख्य चौक, रस्ते, उड्डाणपूल उजळविण्यासाठी पालिकेने विद्युत रोषणाई केली. मात्र, या झगमगाटाचा शॉक मुंबईकरांना बसणार आहे. सुशोभीकरणामुळे वीजबिलात १० ते १५ टक्के वाढ झाली असून, या वीजबिलाची पालिका मुंबईकरांकडूनच कर रूपाने वसुली करून घेणार आहे.

मुंबईचे सौंदर्यीकरण करण्यासाठी पालिकेने हजारो कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. या अंतर्गत पालिकेने रस्त्यांची दुरुस्ती, पदपथाचे सुशोभीकरण, भिंतींना रंगरंगोटी अशी विविध कामे केली जाणार असून, या कामांसाठी १ हजार ७२९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.  प्रत्येक प्रभागासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २४ विभागांच्या स्तरावर निविदा मागविण्यात आल्या होत्या.

सुशोभीकरणाची ६५ टक्के कामे पूर्ण झाली असून, ३५ टक्के कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा, मोकळ्या जागांच्या ठिकाणी करण्यात आलेल्या रोषणाईमुळे प्रखर प्रकाश लगतच्या वसाहतींमधील रहिवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्याचप्रमाणे, उंच खांबांवर करण्यात आलेली रोषणाई पावसाळ्यात टिकणार का, असा सवाल निर्माण होत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या पैशांचा अपव्यय कशासाठी, असा सवाल निर्माण होत आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या रोषणाइवर टीका करताना एखाद्या बारमध्ये आल्यासारखे वाटते असे म्हटले होते. तसेच सर्व विरोधी पक्षांनीही रोषणाइवर इतका खर्च कशासाठी करायचा असा सवालही विचारला होता. जी २० परिषदेच्या निमित्ताने पालिकेने सुशोभीकरण हाती घेतले होते. त्यात विद्युत रोषणाइ याचाही समावेश होता. या परिषदेला येणाऱ्या परदेशी पाहुण्यांवर छाप पाडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ही कामे वेगाने पूर्ण करण्यात आली होती.आज शहराच्या अनेक भागात जेथे विजेची गरज आहे तेथे अंधार असून विजेची अशी उधळपट्टी सुरू असल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. 

अंधारातूनच तेथील नागरिकांना ये-जा करावी लागते. त्यामुळे जिथे बत्ती गुल असते तेथे आधी प्रकाश पाडा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया मुंबईकरांमधून उमटू लागल्या आहेत. आता बिलाची वसुली नागरिकांच्या करातून होणार असल्याने राजकीय मंडळींना पुन्हा नवा मुद्दा मिळाला असून यावरूनही राजकारण सुरू होईल असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. तेव्हा प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

बिलाने असा दिला झटका
रस्त्यावरील आणि उद्यानांमध्ये करण्यात आलेल्या लायटिंगचे ऑक्टोबर, २०२२ चे वीजबिल ७३ लाख ७८ हजार ३५८ तर नोव्हेंबर, २०२२ मध्ये ७४ लाख १६ हजार ६२१ इतके आले होते. यानंतर, लायटिंग सुरू केल्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये ७५ लाख ४३ हजार ६४४ रुपये, जानेवारी २०२३ मध्ये १ कोटी ५१ लाख ८८ हजार ४४६ रुपये, फेब्रुवारीत ७४ लाख ९७ हजार ७५० इतके वाढीव बिल आले आहे.

Web Title: Mumbai: Mumbaikars will get a big shock due to lightning, 15 percent increase in the electricity bill of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.