मुंबई: आठ समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांच्या सुविधेसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र, ही सुविधा होण्यास दिरंगाई होत असल्याने किनाऱ्यावर जायचे कुठे, असा प्रश्न येणाऱ्यांना पडला आहे.
या आधीच्या निविदा प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाला यासाठीच्या निविदा प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरूवात करावी लागली आहे. समुद्र किनारपट्टी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीच्या मोहिमेंतर्गत तसेच राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. समुद्र किनारा परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटक यांच्या सुविधेसाठी फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने सप्टेंबरमध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली, मात्र अडचणीमुळे ती झाली नाही.
सौरऊर्जेचा होणार वापर :
स्वच्छतागृहांच्या ठिकाणी विजेची सुविधा म्हणून सौरऊर्जेचा वापर करण्याचे प्रामुख्याने सुचवण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या प्रत्येक स्वच्छतागृहात महिला (३), पुरूष (३) आणि दिव्यांग व्यक्तिसाठी (१) याप्रमाणे ७ शौचकुपांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. दिव्यांग व्यक्तिंसाठी ‘लो फ्लोअर’ स्वच्छतागृहांची सुविधा पुरवण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
कंत्राटदाराला दंड ठोठावणार
दरम्यान. या संदर्भात संबंधित कंत्राटदाराला आवश्यक तो दंड ही पालिकेकडून ठोठावण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मात्र स्वच्छतागृहांचे काम थांबू नये, या कारणास्तव पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून पुन्हा निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
फिरत्या स्वच्छतागृहांची सुविधा :
समुद्रातील तरंगते रेस्टॉरंट बंद; मात्र ऑनलाइन बुकिंग! मुंबईत गिरगाव (२), दादर आणि माहीम (८), जुहू (६), वर्सोवा (४), वर्सोवा (१), मढ – मार्वे (१), मनोरी – गोराई (२) या आठ समुद्र किनाऱ्यांवर मिळून एकूण २४ फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात येतील.
या स्वच्छतागृहांच्या संचलन आणि देखभालीची जबाबदारी ही कंत्राटदाराची असेल. दर दिवशी पाच वेळा स्वच्छता आणि त्यासाठी तीन पाळ्या असणार.
स्थानिकांचा होतोय विरोध :
समुद्र किनारपट्टीचा परिसर स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई पालिकेला स्वच्छतागृहांची सुविधा पुरविण्याची सूचना केली होती. पालिकेमार्फत प्रयत्न होत असताना काही ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून विरोध होत आहे. अक्सा, वर्सोवा याठिकाणी जागा बदलण्याची वेळ आली.