Join us

वर्ष झाले! समुद्राच्या प्रदूषणावर पालिकेला हवाय सल्ला

By सीमा महांगडे | Updated: January 11, 2024 10:00 IST

रोखणार मलनिःसारण वाहिन्यांतील सांडपाणी.

सीमा महांगडे, मुंबई :  मोठे नाले, उपनाले, पर्जन्य जलवाहिन्यांतून वाहणारे सांडपाणी रोखण्यासाठी मुंबई पालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, समुद्र, खाद्य आणि नद्या दूषित होण्यास कारणीभूत ठरणारे मलनिःसारण वाहिन्यांतील प्रवाह बंद करणे, अन्यत्र हलवणे यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता पालिकेकडे सल्लागारच नाही. १ जानेवारी २०२२ ते १ डिसेंबर २०२३ या कालावधीत पालिकेच्या  एमएसडीपी विभागाकडून नियोजन कसे करावे आणि अंमलबजावणी कशी व्हावी, यासाठी सल्लागारच नेमल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे.  

मुंबई शहर आणि उपनगरात मिळून २९ मोठे नाले आहेत. हे नाले व उपनाले खाड्या, समुद्रात विलीन होतात.  पावसाळा संपल्यानंतरही हे नाले, पर्जन्य जलवाहिन्यांमधून सांडपाणी समुद्राला जाऊन मिळते. प्रक्रिया न केलेल्या या सांडपाण्यामुळे समुद्र दूषित होत असतो. नद्या, तलाव, खाडी यामध्ये बिनपावसाळी प्रवाह, प्रक्रिया न केलेले सांडपाणी, अर्धवट प्रक्रिया केलेले मलप्रवाह समुद्राला जाऊन मिळाल्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला यापूर्वीच सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता समुद्र दूषित होण्यास कारणीभूत ठरणारे प्रवाह बंद करणे, अन्यत्र हलवणे या कामांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला. 

महिनाभरात नियुक्ती :

पालिकेकडून मागच्या एप्रिल महिन्यात सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. पुढच्या महिन्यात पूर्व, पश्चिम उपनगराच्या सल्लागारांची नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले.

माहितीच्या अधिकारातून समोर :

सामाजिक कार्यकर्ते गॉडफ्रे पिमेंटा यांनी यासंदर्भात विभागाकडे ही माहिती मागवली होती. माहितीच्या अधिकारात मागील वर्षभरापासून सल्लागार नियुक्त नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली. 

त्यामुळे आतापर्यंत मलनिःसारण विभागाकडून हे सांडपाणी नद्या, समुद्रात जाऊ नये यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली नाही.

टॅग्स :मुंबईनगर पालिकाप्रदूषण