मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांची 'फेम इंडिया २०२०' मध्ये निवड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 09:35 PM2020-10-17T21:35:49+5:302020-10-17T21:37:17+5:30
Iqbal Singh Chahal : कोरोनाला पळवून लावण्यासाठी 'चेस द व्हायरस' ही आयुक्त चहल यांची मोहीम प्रभावी ठरली.
मुंबई : जागतिक स्तरावर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे कौतुक झाल्यानंतर आता त्यांची निवड 'फेम इंडिया २०२०' मध्ये झाली आहे. देशभरातील ५० प्रभावशाली सनदी अधिकाऱ्यांच्या कार्याची नोंद यामध्ये घेण्यात येते. गेल्याच महिन्यात 'आयएसीसी कोविड क्रुसेडर २०२०” या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
कोरोनाला पळवून लावण्यासाठी 'चेस द व्हायरस' ही आयुक्त चहल यांची मोहीम प्रभावी ठरली. यात टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि क्वारंटाईन ही पंचसुत्रे अवलंबून प्रत्यक्ष काम केले. तसेच, मुंबईतील सर्व आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, खासगी दवाखाने व नर्सिंग होम, स्वयंसेवी संस्था या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून मुंबईतील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणली. या कामगिरीचे केंद्र सरकारसह जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँकेनेही कौतुक केले.
धारावीसारख्या झोपडपट्टीबहुल भागात अथक परिश्रम करुन कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न तर इतर देशांनीही धारावी मॉडेल म्हणून स्वीकारले. कोरोना लढ्यात त्यांनी दिलेल्या मोठा योगदानासाठी इंडो - अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्समार्फत आयएसीसी कोविड क्रुसेडर २०२० - एक्झेम्प्लरी वर्क डन बाय ए ब्युरोक्रॅटस् - इंडिया या संवर्गामध्ये आयुक्त चहल यांना पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर आता 'फेम इंडिया २०२०' मध्ये चहल यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.