महापालिकेची 'झाडा' झडती!; १५० कंत्राटदारांना प्रशासनाने दिली तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 09:51 IST2025-03-08T09:51:03+5:302025-03-08T09:51:44+5:30
सर्वाधिक नोटीस या गोरेगाव विभागातील कंत्राटदारांना बजावण्यात आल्या आहेत.

महापालिकेची 'झाडा' झडती!; १५० कंत्राटदारांना प्रशासनाने दिली तंबी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रस्त्यांची कामे करताना झाडांच्या मुळांना इजा पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांकडे पालिकेच्या उद्यान विभाग आणि रस्ते विभागाने आता आपला मोर्चा वळवला आहे. याप्रकरणी विविध वॉर्डातील १५० कंत्राटदारांना नोटीस पाठवण्यात आल्या असून, या कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे. यातील सर्वाधिक नोटीस या गोरेगाव विभागातील कंत्राटदारांना बजावण्यात आल्या आहेत.
झाडांना हानी पोहोचवल्याबद्दल पालिकेच्या उद्यान विभागाने गुरुवारी दक्षिण मुंबईतील कंत्राटदाराला २० हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
वृक्ष कोसळण्याची दाट शक्यता
रस्त्यांची कामे करताना झाडांच्या बुंध्याभोवती काँक्रीटीकरण करणे, रस्ता खोदताना झाडांच्या मुळांना धक्का पोहोचवणे असे उद्योग केले जातात. त्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होऊन भविष्यात झाड मृत होण्याची किंवा कोसळण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी उद्यान विभागाने काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा पाठविल्या आहेत.