Join us

पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण असलेली इमारत सील करणार; बाहेर पोलिसांचा पहाराही लावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 1:19 PM

डेल्टामुळे मुंबई महापालिका सतर्क

मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्यतज्ज्ञांनी वर्तविला असताना ‘डेल्टा’ विषाणूचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड  केंद्रांना सतर्क राहण्याचे आदेश महापालिका आयुक्त इकबाल  सिंह चहल यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. कोविड रुग्णांसाठी खाटा वाढविणे, औषध - इंजेक्शनचा साठा ठेवणे, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा असल्याची खातरजमा करण्याची ताकीद संबंधितांना दिली आहे.

मागील काही दिवसांमध्ये कोविड बाधित रुग्णांमध्ये किंचित वाढ दिसून येत आहे. कोविड विषाणूच्या डेल्टा प्रकाराचाही समावेश आहे. याची गंभीर दखल घेऊन आयुक्तांनी सोमवारी ऑनलाइन आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी व विविध रुग्णालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते. कोविड प्रतिबंधक नियमांच्या कठोर अंमलबजावणीचे निर्देश आयुक्तांनी दिले.

सील इमारतींबाहेर पोलीस पहारा

पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण असलेली इमारत सील करण्यात येते. अशा इमारतींमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहनचालक यांचादेखील समावेश असेल. तसेच सील इमारतींच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.

सार्वजनिक शौचालयांचे निर्जंतुकीकरण

कोरोनाच्या प्रसारास झोपडपट्टी व चाळीतील सार्वजनिक शौचालय कारणीभूत ठरतात. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक शौचालयांचे दररोज पाच वेळा निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

मलेरिया, डेंग्यूपासून सावध....

कोविड व्यतिरिक्त मलेरिया, डेंग्यू या आजारांबाबतही सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश कीटकनाशक विभागाला देण्यात आले आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई महानगरपालिका