मुंबई : मुंबई महापालिका आणि बिल्डर लॉबी यांच्यामध्ये मिलीभगत आहे. यामुळे अनधिकृतपणे बांधलेल्या इमारतींना व बांधकामांना परवानगी दिली जाते. महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांचे संरक्षण मिळते आणि मनपा आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे संरक्षण मिळते, अशा शब्दांत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारावर आणि राज्य सरकारवर टीका केली.
काही दिवसांपूर्वीच परळ येथील क्रिस्टल टॉवरला आग लागली होती. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर 21 जण गंभीर झाले होते. घटनास्थळाची निरुपम यांनी आज पाहणी केली. पुनर्विकास झालेल्या या इमारतीमध्ये बेकायदा झालेले आहे. यातील एक फ्लॅट इमारतीच्या रिफ्युज्ड भागात होता. या इमारतीला 2012 पासून ओसी नाही. फायर ऑडिटही नीट झालेले नाही. मग सुपारीवाला बिल्डरला नवीन इमारत बांधण्याची परवानगी कशी मिळाली, असा सवालही निरुपम यांनी उपस्थित केला. या बिल्डरने आजपर्यंत 170 इमारती बांधल्या आहेत. तर काही निर्माणाधीन आहेत. महापालिका अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय अशा प्रकारे अनधिकृत बांधकामाला परवानगी मिळत नाही. असे अनेक बिल्डर आहेत, ज्यांच्यावर महापालिकेचा वरदहस्त आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महापालिका स्वत:च सांगतेय की मुंबईत तब्बल 55 हजार इमारती ओसीविना आहेत. ज्याचे फायर ऑडिट झालेले नाही. तिथेही आगीसारख्या दुर्घटना घडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कमला मिल आगीनंतर अनेक हॉटेलांवर कारवाई केली. मात्र, पुन्हा सर्व पुर्वपदावर आले आहे. जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईकरांची चिंता आहे. तर हे सर्व बंद करायला हवे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही निरुपम यांनी केली.
यावेळी निरुपम यांच्यासोबत माजी खासदार एकनाथ गायकवाड, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते डॉ राजू वाघमारे उपस्थित होते.