मुंबई - मागील वर्षी २०२३-२४ मुंबई महानगरपालिकेने आरोग्यासाठी अर्थसंकल्पामध्ये १३८४.०४ कोटींची तरतूद केली होती. यंदा मात्र या निधीत भरघोस वाढ करून २०२४-२५ कालावधीसाठी१७१६.८५ कोटींची इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पालिकेकडून अधिकाधिक प्रभावी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत
मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना त्रिस्तरीय आरोग्य सेवा पुरविल्या जातात. अशा सेवा देणारी ही देशातील एकमेव यंत्रणा आहे. यामध्ये, २१२ आरोग्य केंद्रे, १९२ दवाखाने, ३० प्रसुतीगृहे व ५ विशेष रुग्णालयांमार्फत प्राथमिक आरोग्य सुविधा; १६ उपनगरीय रुग्णालयांमार्फत द्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा व ४ वैद्यकीय महाविद्यालये, प्रमुख रुग्णालये आणि १ दंत महाविद्यालयामार्फत तृतीय स्तरावरील आरोग्य सेवा यासारख्या सर्वसमावेशक सेवा पुरविल्या जातात.
शून्य प्रिस्क्रिप्शन धोरणासाठी ५०० कोटींची तरतूद,अभ्यासगटाचीही स्थापनामुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व रुग्णांना आरोग्यसेवा सवलतीच्या दरात देण्यात येतात. अनुसूचीवर नसलेली औषधे व आधुनिक स्वरुपांची औषधे व रोपण साहित्य रुग्णांना बाहेरुन खरेदी करावी लागतात. त्यामुळे, नवीन वर्षात मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण राबविण्यात येणार आहे. ज्यामध्ये विविध अभ्यासगट स्थापन केले असून त्याद्वारे, अत्यावश्यक नसलेली औषधे वगळून उर्वरीत सर्व आवश्यक औषधे रुग्णालयाकडूनच उपलब्ध करण्याकरीता आवश्यक औषधांचा अनुसूचीमध्ये समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत आरोग्य योजना व गरीब रुग्ण सहाय्यता निधीमधून खरेदी करण्यात येणाऱ्या गोष्टींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दर परिपत्रक प्रसारीत करण्यात येणार आहे. यंदा ५०० कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.