मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारींत ५४ टक्के वाढ, ९0 टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 03:23 AM2019-08-17T03:23:58+5:302019-08-17T03:24:29+5:30

मुसळधार पावसाने मुंबईतील रस्त्यांची चाळण केली आहे. अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत.

Mumbai Municipal corporation claims 90% pothole's is pack | मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारींत ५४ टक्के वाढ, ९0 टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा

मुंबईत खड्ड्यांच्या तक्रारींत ५४ टक्के वाढ, ९0 टक्के खड्डे बुजविल्याचा महापालिकेचा दावा

googlenewsNext

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईतील रस्त्यांची चाळण केली आहे. अनेक रस्ते खड्ड्यात गेले आहेत. गेल्या वर्षभराच्या तुलनेत एप्रिल ते जुलै २०१९ या चार महिन्यांत ५४ टक्क्यांहून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. मुंबईतील रस्त्यांचे हे वास्तव माहितीच्या अधिकाराखाली उजेडात आले आहे. यापैकी ९० टक्के खड्डे बुजविण्यात आले असून ४१४ खड्डेच शिल्लक असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे.
‘पोटहोल ट्रॅकिंग सिस्टिम’ या संकेतस्थळामुळे मुंबईतील खड्ड्यांची आकडेवारी समोर येत होती. यामुळे पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत असल्याने प्रशासनाने खड्ड्यांची नोंद ठेवणारी यंत्रणाच बंद केली. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकाराखाली खड्ड्यांची आकडेवारी उघड केली आहे. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीत चार हजार ९१० खड्ड्यांच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. गेल्या चार महिन्यांत २६६१ तक्रारी आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
यापैकी २४६२ खड्डे बुजविण्यात आले असून १९९ खड्डे शिल्लक असल्याचे प्रशासनाने माहिती अधिकाराखाली सांगितले आहे. यामध्ये सर्वाधिक ३६५ तक्रारी अंधेरी पूर्व आणि जोगेश्वरी येथून आल्या आहेत. त्यापाठोपाठ भांडुप येथून २१८, मालाड, मालवणी येथून १९३ आणि अंधेरी पश्चिम येथून १८८ तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे भरण्याची आर्थिक तरतूद दरवर्षी वाढत आहे.

एका खड्ड्याचा खर्च १७ हजार रुपये
एक खड्डा भरण्यासाठी १७ हजार ६९३ रुपये खर्च येत असल्याची आकडेवारी माहिती अधिकाराखाली समोर आली आहे. २०१३ ते २०१९ या कालावधीत खड्डे भरण्यासाठी एकूण १७५ कोटी ५१ लाख ८६ हजार रुपये खर्च झाले आहेत. मात्र कोट्यवधी रुपये खड्ड्यात गेल्यानंतरही रस्त्यांची परिस्थिती दयनीयच आहे.

खड्ड्यांमध्ये झाडे लावणार
वर्षानुवर्षे मुंबईतील रस्त्यांची स्थिती सारखीच आहे. रस्ते खड्ड्यात गेले आहेत. पालिका प्रशासनाने लवकर खड्डे न भरल्यास त्यामध्ये झाडे लावण्यात येतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी दिला आहे.

 

Web Title: Mumbai Municipal corporation claims 90% pothole's is pack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.