Join us

वाऱ्याच्या वेगाने मुंबई महापालिकेने केले हजार लोकांना हॉटेलबंद

By अतुल कुलकर्णी | Published: December 24, 2020 5:38 AM

Mumbai Municipal Corporation : सात दिवसांनंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. त्यात ते निगेटिव्ह निघाले तरच त्यांना घरी सोडले जाईल.

-   अतुल कुलकर्णी

मुंबई : केंद्र सरकारने ब्रिटनमधून भारतात येणारी विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या सात तासांत मुंबई महानगरपालिकेने वाऱ्याच्या वेगाने कारवाई केली. यूकेमधून मुंबई विमानतळावर विमाने येताच, त्यातील प्रवाशांना थेट बसमध्ये बसवून हॉटेलमध्ये रवाना केले गेले.  सात दिवसांनंतर हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. त्यात ते निगेटिव्ह निघाले तरच त्यांना घरी सोडले जाईल. घरीही त्यांना सात दिवस विलगीकरणात राहावे लागेल. सक्तीने हॉटेलमध्ये पाठवण्यात आलेल्यांमध्ये अक्षयकुमारची पत्नी ट्विंकल खन्ना, आ. धीरज देशमुख यांच्या पत्नी दीपशिखा देशमुख यांचाही समावेश आहे.

याबाबत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी सांगितलेली हकिकत अशी-   सोमवारी सायंकाळी ४ वाजता केेेंद्र सरकारने विमानसेवा बंद केल्याचा आदेश मिळाला. तातडीने साडेचार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या बैठका रद्द करून मुख्य सचिव संजयकुमार, मी आणि अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. बैठकीत काही निर्णय घेतले गेले. मला व्यवस्था करायची आहे, असे सांगून आपण मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन अर्ध्या तासात बीएमसीकडे निघालो. वर्षावरून मुंबई महापालिकेत पोहोचेपर्यंत ट्रायडंट, मेरियट, ताज आणि अन्य काही हॉटेलच्या प्रमुखांशी बोललो. आपल्याला येत्या तीन तासांत दोन हजार रूम हव्या आहेत, असे त्यांना सांगितले. वेगाने सगळी यंत्रणा कामाला लागली. महापालिकेत सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासह बेस्टचे अधिकारी, अन्य सहआयुक्त सगळे रात्री १२ पर्यंत बीएमसीमध्ये ठाण मांडून कामाचे वाटप करत होते. 

तणावपूर्ण वातावरणात मानवी संवेदनशीलतायेणाऱ्या प्रवाशांमध्ये तीन महिला प्रेग्नंट असल्याचे कळाले. त्यांची डिलिव्हरी काही दिवसांत अपेक्षित आहे, हे कळल्यानंतर त्यांच्याकडून ‘आम्ही फक्त दवाखान्यासाठी बाहेर जाऊ’ असे शपथपत्र लिहून घेतले व त्यांना घरी सुरक्षितपणे पोहोचवले गेले. आजही त्यांच्या घरी बीएमसीचे कर्मचारी चौकशी करत आहेत, असे आयुक्त चहेल यांनी सांगितले.

येत्या १० दिवसांत रोज चार हजार रूम लागणार- यूकेमधून येणारी विमाने आता बंदच झाली आहेत. पण, अनेक प्रवासी कनेक्टिंग विमान घेऊन अन्य देशांतून येतात. युरोपियन आणि मिडल ईस्टमधून येणा-या विमानांवर बंदी नाही. त्यामुळे त्या प्रवाशांना सक्तीने क्वारंटाइन केले जाणार आहे.  त्यासाठी हॉटेलच्या चार हजार खोल्या रोज लागणार आहेत. पुढच्या १० दिवसांत ४० हजार खोल्या लागतील. मात्र, कालपासून अनेकांनी विमानाची तिकिटे रद्द करणे सुरू केल्यामुळे किमान एक हजार खोल्या रोज लागणार आहेत.  त्यांची यादी आज आपल्याकडे तयार आहे, असेही चहेल यांनी सांगितले. शिवाय, यादीही देऊ केली.

‘त्या’ रात्री एकही प्रवासी मुंबईत घरी गेला नाही- आलेल्या प्रवाशांपैकी जवळपास ३० टक्के प्रवासी अन्य राज्यांत जाणारे होते. त्यांचा मुंबईत क्वारंटाइन होण्यास विरोध होऊ लागला. त्यांचा रोष वाढत असल्याचे कळताच पुन्हा मुख्यमंत्र्यांशी बोलून रात्री निर्णय घेतला गेला. - त्या प्रवाशांची वेगळी यादी केली. संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना आपल्या उपायांसह ती कळवली गेली. आज आपण शपथपत्रावर लिहून द्यायला तयार आहोत की, त्या रात्री एकही प्रवासी मुंबईत त्याच्या घरी गेलेला नाही. सगळेच्या सगळे हॉटेलवर पोहोचवले गेले आहेत, असेही चहेल यांनी ठामपणे सांगितले.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस