मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी यंदा दिवाळीचा बोनस म्हणून २५ हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. बुधवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांच्यात बोनसच्या मुद्द्यावरून बैठक झाली. त्यात ही मागणी करण्यात आली. बोनसची रक्कम मंजूर झाली नसली तरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यावर तोडगा काढला जाणार आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता.
आयुक्तांशी झालेल्या चर्चेत युनियनचे सर्व मुद्दे मांडण्यात आले. यंदा २० ऐवजी २५ हजार रुपयांच्या बोनसची मागणी करण्यात आली. वाढीव बोनसच्या रकमेबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी युनियनला दिले.
दरम्यान, महापालिकेत साडेचारशे कंत्राटी कामगार असून, गेल्या पंधरा वर्षांपासून नोकरी करत आहेत. त्यांना साधे किमान वेतनदेखील मिळालेले नाही. त्यांना बोनसही मिळत नाही. मुंबई वगळता उर्वरित महापालिका कंत्राटी कामगारांना बोनस देतात. त्यामुळे त्यांनाही बोनस दिला जावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.