मुंबई महापालिकेने थकवला मालमत्ताकर; ‘त्या’ परिपत्रकाचा आधार घेत दिला जातो नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 09:37 AM2022-03-26T09:37:07+5:302022-03-26T09:37:37+5:30

स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन प्रत्येक वर्षी मालमत्ताकर भरण्याची नोटीस देते. परंतु त्यास मुंबई मनपा पाणीपुरवठा विभाग केराची टोपली दाखवीत आहे.

Mumbai Municipal Corporation exhausted property tax | मुंबई महापालिकेने थकवला मालमत्ताकर; ‘त्या’ परिपत्रकाचा आधार घेत दिला जातो नकार

मुंबई महापालिकेने थकवला मालमत्ताकर; ‘त्या’ परिपत्रकाचा आधार घेत दिला जातो नकार

Next

भिवंडी : मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पिसे ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा मालमत्ताकर सहा वर्षांपासून थकविला आहे. 
मुंबई मनपा क्षेत्रासाठी भातसा धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा पिसे पांजरापोळ येथे अडवून जलप्रक्रिया केल्यानंतर येथून पुढे जलवाहिनीद्वारे वितरण केला जातो. त्यासाठी पिसे येथे पाणीपुरवठा विभागाचा प्रकल्प, विद्युत यंत्रणा व निवास व्यवस्था इमारती आहेत. येथील निवासी इमारतीचे सुरुवातीपासून मालमत्ताकर संबंधित पिसे ग्रामपंचायतीला दिला जात असताना २०१६ पासून सार्वजनिक प्रयोजनार्थ असलेल्या शासकीय मालमत्ता यांना मालमत्ता करातून सूट द्यावी, अशा एका शासकीय परिपत्रकाचा आधार घेत पाणीपुरवठा विभाग मालमत्ता कर भरत नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन प्रत्येक वर्षी मालमत्ताकर भरण्याची नोटीस देते. परंतु त्यास मुंबई मनपा पाणीपुरवठा विभाग केराची टोपली दाखवीत आहे.

२०१६ मध्ये येथील निवासी इमारतीवर एक लाख ३८ हजार ८९ रुपये मालमत्ताकर आकारणी केली गेली. परंतु, सुरुवातीस चुकीच्या पद्धतीने आकारणी केल्याचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाणीपुरवठा विभागाच्या उपजलअभियंता, पिसे पांजरापूर यांनी सरकारच्या २०१५ च्या परिपत्रकाचा आधार घेत करभरणा करण्यास नकार दिला आहे. 

वास्तविक ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ३१ डिसेंबर २०१५ ला प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या मालकीच्या आणि केवळ 
सार्वजनिक प्रयोजनासाठी उपयोगात आणण्याचा इरादा असलेल्या आणि नफ्याच्या प्रयोजनासाठी उपयोगात न आणल्या जाणाऱ्या मालमत्तांना मालमत्ता करातून सूट द्यावी, असे म्हटले असताना त्याचा सोयीस्कर अर्थ मुंबई मनपाकडून लावला जात आहे. निवासी इमारती या सार्वजनिक प्रयोजनार्थ बनविलेल्या नसून, तेथे वास्तव्यास असल्याने त्यांनी मालमत्ताकर भरला पाहिजे, ग्रामपंचायतीस मुंबई मनपा देत असलेल्या पाण्याचे बिल घेऊ शकते, तर त्यांनी आमच्या हक्काचे मालमत्ताकर भरणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ तथा शिवसेना उपतालुक प्रमुख विजय पाटील यांनी केली आहे. 

‘वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन कार्यवाही करू’
याबाबत योग्य ते मार्गदर्शन वरिष्ठांकडून घेऊन योग्य ती कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया भिवंडी पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे. त्यांच्याकडून निर्णय आल्यावर ग्रामपंचायत नक्कीच पाऊल उचलेल.

Web Title: Mumbai Municipal Corporation exhausted property tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.