मुंबई महापालिकेने आज आपला अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये १७.७० टक्के वाढ करण्यात आली. याचबरोबर दिलासादायक बाब म्हणजे कोणताही थेट करवाढ करण्यात आली नाही. मुंबई महापालिकेने इलेक्ट्रीक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन वाढविण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.
इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढावा या उद्देशाने मुंबई महापालिकेने खासगी आणि सरकारी कंपन्यांना चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी शहरभरातील जवळपास १२ जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. या जागांवर या कंपन्या त्यांच्या सुविधा उपलब्ध करणार आहेत.
गेल्या वर्षी आरोग्य क्षेत्रासाठी ६ हजार ६२४.४१ कोटींची तरतूद करण्यात आली होती, यंदा यात वाढ करून ६ हजार ९३३.७५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विकास नियजन खाते १००२.१५ कोटी, घनकचरा व्यवस्थापन - ३७०.९९ कोटी, गोरेगाव मुलुंड जोड रस्ता - १३०० कोटी, पर्जन्य वाहिन्या १५३९.७९ कोटी, आश्रेय योजना अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती - १३०० कोटी असे नियोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाकांक्षी सागरी किनारा प्रकल्पावर ३२०० कोटी, रस्ते - २२०० कोटी, पूल दुरुस्ती - १५७६.६६ कोटी अशी तरतूद करत मुंबई पालिकेने सन २०२२-२०२३ चा ४५ हजार ९४९.२१कोटींचा आणि ८.४३ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प सादर केला.