Join us

निकाल येण्यापूर्वीच झाडांच्या रोषणाईची बत्ती होणार गुल ? न्यायालयाने मागवले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 10:08 AM

मुंबई सुशोभीकरणाच्या अंतर्गत  झाडांच्या भोवती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईची बत्ती गुल होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुंबई सुशोभीकरणाच्या अंतर्गत  झाडांच्या भोवती करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईची बत्ती गुल होण्याची शक्यता असून, रोषणाई काढून टाकण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतल्याचे कळते. जनहित याचिकेद्वारे विद्युत रोषणाईला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, न्यायालयाने संबंधित यंत्रणांकडे स्पष्टीकरण मागवले आहे; मात्र निकाल येण्यापूर्वीच रोषणाई बंद केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.जी- २० परिषदेपासून मुंबईत  ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. विशेष करून उड्डाणपूल आणि झाडांच्या भोवती रोषणाई केली आहे. अलीकडच्या काळात मुंबई सुशोभीकरणाची  मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

झाडांभोवतालीच्या रोषणाईला आक्षेप घेत त्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या रोषणाईमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत सरकार गंभीर आहे का, प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी काही नियम आहेत का, झाडांवर रोषणाई करण्याचे कारण काय, अशा आशयाची जनहित याचिका आहे. सुनावणी सुरू करण्यापूर्वी न्यायालयाने राज्य सरकार, तसेच मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिकेकडे स्पष्टीकरण मागवले आहे.

१)  या मोहिमेसाठी सुमारे १७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. विविध प्रकारची ५२ कामे हाती घेण्यात आली आहेत. 

२)  त्यात झाडे आणि उड्डाणपुलांना विद्युत रोषणाई, उड्डाण पुलांच्या खाली रंगरंगोटी, रस्त्यावर अँटिक दिवे, रस्ता दुभाजकावर शोभिवंत झुडपे  आदी कामांचा यात समावेश आहे. 

३)   झाडांभोवतालच्या विद्युत रोषणाईवरून मुंबई महापालिकेवर टीका होत आहे.  अशा प्रकारच्या रोषणाईमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला जात असल्याचा मुख्य आक्षेप आहे. 

४)  रोषणाई आणि वीजबिलासाठी पालिकेला २०० कोटी रुपये खर्च आल्याचे समजते.

झाडांभोवतालीच्या रोषणाईला आक्षेप घेत त्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या रोषणाईमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत सरकार गंभीर आहे का, प्रदूषण आटोक्यात ठेवण्यासाठी काही नियम आहेत का, झाडांवर रोषणाई करण्याचे कारण काय, अशा आशयाची जनहित याचिका आहे. सुनावणी सुरू करण्यापूर्वी न्यायालयाने राज्य सरकार, तसेच मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिकेकडे स्पष्टीकरण मागवले आहे.

काय आहे आक्षेप?

पशू, पक्षी आणि कीटकांचा दिनक्रम सूर्योदय आणि सूर्यास्तावर  ठरलेला असतो. रोषणाईमुळे  त्यांना दिवस आणि रात्रीतला  फरक समजत नाही. स्थलांतर पक्ष्यांची दिशाभूल होते. रोषणाईमुळे फळा, फुलांचा बहर कमी होतो, पानगळ लवकर होते. रोषणाई करताना झाडांना खिळे ठोकले जातात.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाउच्च न्यायालय