-महेश कोलेमुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या देखभालीसाठी आवश्यक असलेला महसूल मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) वर्षानुवर्षे थकवला आहे. मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वेचे एकूण ५७८ कोटी रुपयांचे ‘वे लिव्ह’ शुल्क बीएमसीकडे थकीत आहे. या संदर्भात लवकरच बीएमसीशी पत्रव्यवहार करण्यात येईल, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गाखालून बीएमसीच्या विविध सुविधा जातात. त्यात पाणीपुरवठा, मलनिःसारण लाईन्स आणि विद्युत लाईन्स आदींचा समावेश आहे.
या सुविधांसाठी बीएमसीने रेल्वेला ‘वे लिव्ह’ शुल्क भरायचे असते. परंतु, सध्या पश्चिम रेल्वेचे ३३८ कोटी रुपये आणि मध्य रेल्वेचे २४० कोटी रुपये अशी मोठी रक्कम थकीत आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासन महापालिकेशी पत्रव्यवहार करणार आहे.
रेल्वेच्या महसुलाचा वाटा
ही थकीत रक्कम रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुधारणा कामांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, बीएमसीकडून वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे रेल्वेच्या महसुलाचा महत्त्वाचा वाटा बुडत आहे.
रेल्वेची देणी पालिका थकवत असल्याचा आरोप
दोन्ही रेल्वे मार्गावर असलेल्या पाण्याच्या जोडणीसाठी रेल्वे पालिकेला कर भरते. सध्या मध्य रेल्वेवर १५५ पाण्याच्या जोडण्या आहेत तर पश्चिम रेल्वेवर २०१ जोडण्या आहेत. याचा कर रेल्वेकडून वेळोवेळी देण्यात येत असला तरी पालिका मात्र रेल्वेची देणी थकवत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बीएमसीने रेल्वेचे वर्षानुवर्षे थकीत असलेले ‘वे लिव्ह’ शुल्क न भरल्याने रेल्वेच्या पायाभूत सुविधा देखरेखीसाठी महत्त्वाचा असलेला महसूल मिळत नसल्याचे चित्र आहे.