'ते' बांधकाम अनधिकृतच, ७ ते १५ दिवसांत पाडा; राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेचा 'अल्टिमेटम'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 10:43 AM2022-05-21T10:43:28+5:302022-05-21T15:06:29+5:30
आज पुन्हा एकदा पालिकेकडून राणा दाम्पत्याला नोटीस देण्यात आली आहे.
मुंबई- खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं मुंबईतील खारमधील निवासस्थान असलेल्या आठव्या मजल्यावर नियमांचा भंग झाल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळून आलं होतं. तसेच पालिकेकडून राणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पालिकेकडून राणा दाम्पत्याला नोटीस देण्यात आली आहे.
निवासस्थानाचा अधिकृत आराखडा मंजूर करण्यात आला होता. मात्र त्याच्याव्यतिरिक्त बांधकाम का केलं?, असा सवाल महापालिकेने राणा दाम्पत्याला केला आहे. तसेच हे अनधिकृत बांधकाम ७ ते १५ दिवसांत पाडा, अन्यथा महापालिकेला कारवाई करावी लागेल, असा अल्टिमेटमही नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
महापालिकेच्या या भूमिकेनंतर राणा दाम्पत्य नियमिततेचा अर्ज करु शकतात. त्यावर पालिकेकडून विचार करण्यात येईल. मात्र राजकीय चित्र पाहता महापालिकेकडून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ते दाद मागण्यासाठी न्यायालयात देखील जाऊ शकतात.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याच्या खारमधील घराची पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर पालिकेनं आज राणा दाम्पत्याला महापालिका कायद्याच्या कलम ३५१ (१ए) च्या अंतर्गत कारणे दाखवा नोटीस पाठवली. त्यानंतर राणा दाम्पत्य ठोस कारण दाखवण्यात अपयशी ठरल्यास, त्यांच्या घरातील अवैध बांधकामावर कारवाई करण्यात येईल, असं पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.