लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. मात्र, मार्च २०२० ते जुलै २०२१ या कालावधीत या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना व औषधोपचारावर महापालिकेने तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आला असल्याने या खर्चामध्ये आणखी वाढ होणार आहे. दरमहा दोनशे कोटी रुपये कोविड प्रतिबंधक उपाययोजनांवर खर्च होत आहेत.
कोरोनाची पहिला लाट मार्च २०२० मध्ये आल्यानंतर पालिकेने १४ जंबो कोविड केंद्रे आणि कोरोना काळजी केंद्रे उभारली. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती, वैद्यकीय उपकरणांची खरेदी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वास्तव्यास असलेल्या हॉटेलचा खर्च, बाधित क्षेत्रामध्ये धान्य पुरवठा आदी कामांसाठी महापालिकेने १६०० कोटी रुपये खर्च केले आहेत, तसेच मास्क खरेदी, ऑक्सिजन प्लांटची निर्मिती, औषधींची खरेदीदेखील करण्यात आली. यासाठी महापालिकेने आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.
आता केवळ देखभालीवर लक्ष केंद्रितमार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत १६३२.६४ कोटी रुपये आकस्मिक निधीतून खर्च करण्यात आले आहेत. आणखी चारशे कोटी रुपये मार्च २०२१ मध्ये मंजूर करण्यात आले. कोविडसंदर्भातील दर महिन्याचा खर्च दोनशे कोटी रुपये असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, जम्बो कोविड केंद्र, कोरोना काळजी केंद्र ही यंत्रणा आधीच कार्यान्वित आहे. त्यामुळे आता त्यांच्या देखभालीवरच खर्च होणार असल्याने कोविड खर्चामध्ये वाढ होणार नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.ऑक्सिजन निर्मितीसाठी चारशे कोटीकोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबईत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे महापालिकेने स्वतः ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या १२ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत, तसेच ऑक्सिजन सिलिंडरची खरेदी केली जात आहे. या सर्व प्रकल्पासाठी चारशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी तब्बल चार हजार ७२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.