मुंबई महानगरपालिकेने आरोग्य भरतीत भूमिपूत्रांना डावलले; कोळी समाजात नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:22 PM2020-04-12T17:22:41+5:302020-04-12T17:23:17+5:30
महापालिकेकडून हॉस्पिटलमधील रिक्त कक्ष परिचर ही पदे अर्ज मागून भरण्यासाठी नुकतीच जाहिरात देण्यात आली आहे.
मनोहर कुंभेजकर
मुंबई :बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार विभागाने 114 कक्ष परिचर या पदांकरिता अर्ज मागविले आहेत.या पदांवर सामाजिक व समांतर आरक्षणद्वारे अर्ज मागविण्यात आले असले तरी विशेष मागास प्रवर्गाकरिता एकही पद भरती प्रक्रियेत नाही.त्यामुळे मुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेल्या कोळी समाजावरच अन्याय असल्याचे निदर्शनास आणून त्या भरती प्रक्रियेमध्ये तात्काळ बदल करावा आणि विशेष मागास प्रवर्गासाठी पदे निर्माण करावी अशी मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कोविड 19 या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांत कोविंड 19 ची बाधा झालेल्या रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन, केवळ कोविड 19 ची बाधा झालेल्या रुग्णांची सेवा तसेच या संदर्भातील इतर कामकाज करण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या कडुन, त्यांच्या अखत्यारीत विशेष रुग्णालयातील रिक्त असलेल्या कक्ष परिचर ही पदे अर्ज मागून भरण्यासाठी नुकतीच जाहिरात देण्यात आली आहे. एकूण 114 पद असून अनुसूचित जातीसाठी 18,अनुसूचित जमातीसाठी 13,इतर मागासवर्गीयांसाठी 25 ,खुल्या गटासाठी 22 अश्या निरनिराळ्या समाज घटकांसह असलेल्या तक्त्यामध्ये विशेष मागास प्रवर्ग या साठी एकही पद राखीव नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महामुंबईतील मूळ भूमिपुत्र असलेला कोळी समाज हा अनुसूचित जमातीमध्ये येत आहे परंतु या समाजाला डावलण्यासाठी निर्माण केलेले जात पडताळणीचे जाचक निकषांमुळेच तो अनुसूचित जमातीच्या सवलतींपासून वंचित राहिला आहे.मात्र 1995 पासून सुरु झालेल्या विशेष मागास प्रवर्गात नाईलाजाने समाविष्ट केला गेला आहे.असे झाले तरी विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण ही त्यांना नाकारण्याचे धोरण शासनाचे आहे की काय?अशी शंका निर्माण करून विशेष मागास प्रवर्गसाठी , भूमिपुत्रांचा साठी राखीव पदे निर्माण करून ही जाहिरात पुन्हा प्रसिद्ध करावी अशी मागणी राजहंस टपके यांनी शेवटी केली आहे.