Join us  

 गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज! मूर्तिकारांना खुशखबर; पालकमंत्र्यांच्या बैठकीत १० मोठे निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2023 8:21 PM

महापालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली.

मुंबई : महापालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई शहराचे पालकमंत्री  दीपक केसरकर, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे , भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे आदी उपस्थित होते. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

दरम्यान, या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गणेश मूर्तिकार/मूर्ती साठवणूकदार यांना परवानगीसाठी असलेली १ हजार असलेली  अनामत रक्कम कमी करून ती १०० रूपये करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या १५ दिवस आधी विसर्जन मार्गाचा आढावा घेऊन योग्य ती खबरदारी घेणे, विसर्जनाचे सर्व मार्ग व त्यावरील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे, शहरात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संख्या वाढवणे, पीओपी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर त्यांचे योग्य पद्धतीने विघटन केले जाईल याची काळजी घेण्याबाबत देखील निर्देश देण्यात आले.

 तसेच गतवर्षी विसर्जन मिरवणुकितील विसर्जनास नेण्यात येणाऱ्या वाहनांवर/ गणेश मिरवणुकितील गणेश भक्तांवर पोलीस खटले दाखल केलेले आहेत. ते काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. चिनी बनवटीच्या मूर्तींवर आळा तसेच प्रतिबंध घालण्यासाठी सुद्धा पाउले उचलली जातील. या वर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे भरविण्यात येतील आणि प्रत्येक गणेश मंडळाकडे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी दिवसातून ३ वेळा महापालिकेच्या वतीने साफसफाई  केली जाणार आहे. यावेळी गणेशोत्सवाच्या विसर्जन काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने गणेश भक्तांचे तोंड गोड करण्याची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले. याशिवाय गणेश विसर्जनावेळी काही अडथळे येऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकागणेशोत्सवमंगलप्रभात लोढाआशीष शेलारदीपक केसरकर