Join us

सर्रास सिटी स्कॅन करणाऱ्या केंद्रांवर मुंबई महापालिकेची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात सर्रास सिटी स्कॅन करून रुग्ण परस्पर नजीकच्या डॉक्टरकडून उपचार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळात सर्रास सिटी स्कॅन करून रुग्ण परस्पर नजीकच्या डॉक्टरकडून उपचार घेतात आणि यंत्रणांच्या मुख्य प्रवाहापासून लपून राहत असल्याने संसर्गाचा धोका वाढत असल्याचे निरीक्षण पालिका प्रशासनाने नाेंदवले. मुंबईत तीव्र संक्रमण काळात जवळपास दिवसाला १५ हजारांच्या घरात सिटी स्कॅन करण्यात आले; मात्र या तपासणीदरम्यान खासगी प्रयोगशाळांकडून रुग्णांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

बऱ्याच नागरिकांकडून एचआरटी सिटी स्कॅन केलेले संशयित रुग्ण पालिकेला माहिती न देता फॅमिली डॉक्टरांकडून उपचार सुरू करतात. २००० रुपये शासकीय दर असताना २,५०० ते २,८०० रुपये आणि २५०० रुपये शासकीय दर असलेल्या सिटी स्कॅनसाठी तीन हजार ते ३,२०० रुपये खासगी प्रयाेगशाळेत आकारले जातात. पावतीही दिली जात नाही, असे रुग्णांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

सिटी स्कॅन अहवालावर आधारित कोरोना उपचार चांगले नाही. परिणामी, आता मात्र या प्रयोगशाळांवर करडी नजर ठेवून रुग्ण लपविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

* कोरोना चाचणी सक्तीचीच!

राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार, सिटी स्कॅनमध्ये कोविडसाठी संशयित व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर घेणे बंधनकारक केले जाईल. त्या व्यक्तीची माहिती तातडीने स्थानिक आरोग्य विभागाला द्यावी लागेल आणि त्यानंतर दोन तासांच्या आत त्याची आरटीपीसीआर किंवा ॲन्टिजन प्रतिजैविक चाचणी बंधनकारक असेल. यामुळे त्या व्यक्तीला खरोखर संसर्ग झाला आहे की नाही, हे स्पष्ट होईल. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी हे नियम बनविण्यात आले होते. त्यानंतर काेराेना नियंत्रणात येऊ लागल्यानंतर सिटी स्कॅन सेंटरच्या व्यवस्थापकांना सूट देण्यात आली होती; पण आता परत त्यांना हे नियम काटेकोर पाळावे लागतील, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

* दरपत्रक लावले पाहिजे

कोरोना संसर्ग काळात खबरदारीचा उपाय म्हणून सिटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यानंतर सिटी स्कॅन केले. सिटी स्कॅनचे शासकीय दर किती आहेत, याची माहिती सर्वसामान्य जनतेला नाही, तसेच अशा केंद्रातही शासकीय दराचा फलक नाही. त्यामुळे जास्त पैसे घेतले जातात. शासकीय दरपत्रक दर्शनी भागात लावायला हवे.

- उमेश पोयरेकर, काळाचौकी

*...तर लॅबचा परवाना रद्द करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बऱ्याचदा डॉक्टर सिटी स्कॅन करायला सांगतात. लॅब व्यवस्थापक तपासणीचा अहवाल लवकर देणे किंवा त्वरित तपासणी/ होम व्हिझिटकरिता सर्रास अतिरिक्त दर आकारतात. असे दर आकारल्यास त्या लॅबचा परवाना रद्द करावा.

- रमेश मेस्त्री, डोंगरी.

* सरकारी अंकुश हवा

काही बोगस प्रयोगशाळा रुग्ण व रुग्णांच्या कुटुंबीयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणे, अहवाल उशिरा देणे किंवा अन्य गैरप्रकार करताना आढळतात. त्यांच्यावर सरकारी अंकुश हवा. प्रशासनाने यासंदर्भातील नियमाची अंमलबजावणी काटेकोर करावी.

- डॉ. प्रसाद कुलकर्णी,

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथाॅलाॅजिस्ट ॲण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट संघटना.

...............................