बाळासाहेबांच्या पुत्रावर महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही- किशोरी पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:38 PM2021-10-18T17:38:42+5:302021-10-18T17:53:54+5:30
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई: अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी (Guru Maa Kanchan Giri) यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. कांचनगिरी यांच्यासोबत सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माँ कांचनगिरी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. "हिंदू राष्ट्राबाबत राज ठाकरे यांच्याशी आज चर्चा झाली. त्यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे. हिंदू राष्ट्राच्या मजबूतीसाठी त्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांना आम्ही केलं", असं कांचनगिरी म्हणाल्या.
कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते, असं सांगत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका त्यांनी केली. बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे, असं कांचनगिरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच राज ठाकरे बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील, असंही कांचनगिरी यांनी स्पष्ट केलं आहे.
गुरू माँ कांचन गिरीजी आणि जगतगुरू सुर्याचार्यजी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'कृष्णकुंज' निवासस्थानी भेट घेतली आणि हिंदुत्व व राष्ट्र उभारणीबाबत चर्चा केली. तसंच, मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले. pic.twitter.com/hqfCRxTph2
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 18, 2021
कांचनगिरी यांच्या टीकेनंतर आता शिवसेनेनेही प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रावर त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलावर अशा पद्धतीने महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या पुत्राने रामजन्मभूमी येथे जाऊन ज्या पद्धतीने काम केले तेव्हा या कांचनगिरी कुठे होत्या, असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ज्यांच्या धुरा चालवायच्या आहेत, त्या चालवा कारण कोणी कुणासाठीही येऊन उभा राहू शकतं, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
...तर मनसेनंभाजपासोबत जावं- गुरू माँ कांचनगिरी
राज ठाकरे यांनी भाजपासोबत जावं का? असं विचारण्यात आलं असता कांचनगिरी यांनी महत्त्वाचं विधान केलं. "मी हिंदूराष्ट्रासाठी काम करत आले आहे आणि यापुढेही करत राहिन. राजकाराणाबाबत मला माहित नाही. मी साध्वी आहे. पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विचारधारा जमत असेल तर मनसेनं भाजपासोबत जायला हवं. कारण देशात सध्या नवं हिंदुत्व जन्माला येतंय आणि हे नवं हिंदुत्व ब्रिटिशांपेक्षाही भारी पडेल. त्यामुळे सर्व हिंदुंनी एकत्र यायला हवं", असं गुरू माँ कांचनगिरी म्हणाल्या.
राज ठाकरे अयोध्येला जाणार-
राज ठाकरे यांची डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याची इच्छा असल्याचंही कांचनगिरी यांनी सांगितलं. "राज ठाकरे यांचा डिसेंबरमध्ये अयोध्येला येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचं अयोध्येत मोठं स्वागत करू, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्यांनी हिंदूराष्ट्राच्या मजबूतीसाठी अयोध्या दौरा करायला हवा", असं कांचनगिरी म्हणाल्या.