पालिकेकडून १० वर्षांत बेस्टला ११ हजार कोटीहून अधिक निधी; जबाबदारी झटकल्याचा आरोप अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:15 IST2024-12-25T08:15:24+5:302024-12-25T08:15:55+5:30
बेस्टच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार!

पालिकेकडून १० वर्षांत बेस्टला ११ हजार कोटीहून अधिक निधी; जबाबदारी झटकल्याचा आरोप अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण
मुंबई :बेस्ट उपक्रमाची जबाबदारी मुंबई महापालिकेकडून झटकली जात असल्याचा आरोप बेस्ट कामगार आणि वाहतूक संघटनांकडून होत आहे. मात्र, मुंबईकरांना सुखकर आणि दर्जेदार प्रवास करता यावा, यासाठी मागील १० वर्षात पालिकेकडून बेस्टसाठी ११ हजार २३२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजली असून, ई बस खरेदीसाठी आतापर्यंत ४९३ कोटी रुपये मिळवून देण्यासाठीही पुढाकार घेतल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाची जबाबदारी झटकली असे म्हणणे योग्य होणार नाही, असेही आता पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
बेस्टच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार!
बेस्ट उपक्रमाची स्थिती चांगली नसून नुकताच या उपक्रमाचा तोट्याचा अर्थसंकल्प पालिकेला सादर करण्यात आला आहे. त्यातच कुर्ला अपघातामुळे बेस्टकडे स्वमालकीच्या बसची कमतरता आणि त्यामुळे भाडेतत्त्वावरील कंत्राटी बसचा वाढत्या वापराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या पार्श्वभूमीवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव, त्यातून उद्भवणाऱ्या अपघातांची शक्यता आणि त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला आहे. या सगळ्ळ्यावर आपली बाजू स्पष्ट करताना महापालिका आयुक्तांनी बेस्ट उपक्रमाच्या पाठिशी प्रशासन खंबीरपणे उभे असल्याचा पुनरुच्चार केला.
बेस्ट रिसिव्हिंग स्टेशनच्या भूखंडाचा लिलाव थांबवला
महसुलात वाढ करण्यासाठी पालिकेकडून मुंबईतील मोक्याच्या ३ ठिकाणच्या भूखंड लिलावाची प्रक्रिया सुरू आहे. यातील एक भूखंड मलबार हिल, येथील बेस्ट रिसिव्हिंग स्टेशनचा असून, तेथील स्थानिकांनी या लिलाव प्रक्रियेला विरोध दर्शवला होता.
या लिलाव प्रक्रियेबद्दल तत्कालीन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही पालिकेला पत्र लिहिले होते. या पार्श्वभूमीवर या भूखंडाचा लिलाव थांबविण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. आवश्यकतेनुसार पालिकेचे भूखंड उपलब्ध करून देण्यात येत असल्याचीही माहिती दिली.
पालिकेने अशी केली मदत
मुंबईची पालक संस्था म्हणून मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याकरिता पालिका बेस्टला सातत्याने मदत करत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
त्यामुळेच २०१९-२० ते २०२३-२४ या पाच वर्षाच्या कालावधीत पालिकेमधून बेस्ट उपक्रमास ८ हजार ५९४ कोटी २४ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षामध्ये पालिकेने उपक्रमाला ८५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय पालिकेने बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) म्हणून या वर्षी ८० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
तसेच, आगामी अर्थसंकल्पातही भरीव तरतूद करण्याचे नियोजन चालू असल्याचे पालिकेने सांगितले.