मुंबई महानगरपालिका आर नॉर्थ वॉर्ड; दहिसरमध्ये पुनर्विकास, वाहतुकीचा प्रश्न जटील
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:22 AM2023-12-22T10:22:33+5:302023-12-22T10:23:21+5:30
दहीसर हे मुंबईचे उत्तरेकडील प्रवेशद्वार; त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे.
दहीसर हे मुंबईचे उत्तरेकडील प्रवेशद्वार; त्यामुळे या परिसरात वाहतुकीचा प्रश्न मोठा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे सुरू असल्याने तो अधिकच गंभीर झाला आहे. दहीसर ते मीरा-भाईंदर लिंक रोड झाल्यास येथील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. येथील ५० टक्के रहिवासी अजूनही बैठ्या वस्त्यांमध्ये राहत असल्याने या भागात पुनर्विकासाचा प्रश्न मोठा आहे. प्रकल्पात बाधित होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुलनेत त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही.
पूर्व सीमा : टी वॉर्डची सीमा
पश्चिम : मनोरी खाडी
उत्तर : दहीसर चेकनाका
दक्षिण : देवीदास लेन, आर-मध्य वॉर्डची सीमा
वॉर्डाचे वैशिष्ट्य :
दहिसर हे मूळचे आगरी, कोळी, वारलींचे. गावठाण, कांदरपाडा, नवगाव, ओवरीपाडा, केतकीपाडा, दहीवली, रावळपाडा, भागलीपाडा, वडारपाडा, घरतनपाडा हे येथील प्रमुख पाडे. येथील गावठाणांचे स्वरूप बदलून उंच इमारती उभ्या राहिल्या. काही वस्त्या अजूनही आपले ऐतिहासिक महत्त्व टिकवून आहेत. दहीसर नदी, मंडपेश्वर गुंफा ही दहीसरची वैशिष्ट्ये आहेत.
मुख्य समस्या :
दहीसरमधील सुमारे ५० टक्के झोपडपट्ट्या, चाळी, बैठ्या घरांमध्ये राहतात. त्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न मोठा आहे. प्रकल्पबाधितांचा प्रश्न मोठा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण असल्याने विकास आराखड्यानुसार राखीव असलेले भूखंड अतिक्रमणमुक्त करणे हे मोठे आव्हान आहे. मुंबईचे प्रवेशद्वार असल्याने वाहतुकीचा प्रश्न गंभीर असून वाहनतळाचा प्रश्नदेखील मोठा आहे.
महापालिका प्रभाग माजी नगरसेवक :
तेजस्वी घोसाळकर : वॉर्ड क्र. १
जगदीश ओझा : वॉर्ड क्र. २
बालकृष्ण ब्रीद : वॉर्ड क्र. ३
सुजाता पाटेकर : वॉर्ड क्र. ४
संजय घाडी : वॉर्ड क्र. ५
हर्षद कारकर : वॉर्ड क्र. ६
शीतल म्हात्रे : वॉर्ड क्र. ७
हरीश छेडा : वॉर्ड क्र. ८
गावठाणांमध्ये रस्ते, पाणी या सुविधा पोहोचविणे हे मोठे आव्हान आहे. इथला बराचसा परिसर सखल असल्याने पावसाळ्यात पाणी साठते. त्यासाठी अनेक ठिकाणी पंप लावण्यात आले आहेत. सुमारे ४५० कोटी खर्चून भगवती रुग्णालयाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे शहरावरील वैद्यकीय सुविधांचा भार कमी होण्यास मदत होईल. दहिसर नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. त्यासाठी सुमारे दीड हजार अतिक्रमणे हटवून संरक्षित भिंत बांधण्यात आली. नदीच्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येणार आहे. - नयनीश वेंगुर्लेकर, सहायक पालिका आयुक्त
शैक्षणिक संस्था : एकूण ४० शाळा. यापैकी २४ खासगी. नामांकित शाळा - सेंट लॉरेन्स, सेंट फ्रान्सिस, युनिव्हर्सल हायस्कूल, संजीवनी वर्ल्ड, सेंट मेरी, सेंट थॉमस, सेंट ल्युईस इत्यादी
पर्यटनस्थळे : मंडपेश्वर गुंफा, पांडवकालीन भाटलादेवी मंदिर, कांदरपाडा तलाव, भावदेवी माता मंदिर, मीनाताई ठाकरे उद्यान, आदी.
२ डिस्पेन्सरी रुग्णालये : हरिलाल भगवती रुग्णालय, एल. टी. रोड केंद्र, वाय. आर. तावडे केंद्र, आनंदनगर केंद्र