गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई पालिका सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:35+5:302021-09-18T04:06:35+5:30
मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. रविवारी अनंत चतुर्दशी असून ...
मुंबई : कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होत आहे. रविवारी अनंत चतुर्दशी असून महापालिकेने विसर्जनासाठी सर्व व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेंतर्गत २४ विभागांमध्ये २५ हजार कामगार, कर्मचारी, अधिकारी हे मुंबईकरांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी कर्तव्यासाठी उपस्थित असणार आहेत, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली. गर्दी टाळण्यासाठी १७३ ठिकाणी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली असून, विविध ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे, फिरती विसर्जन स्थळे कार्यरत आहेत. ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळे असून, या ठिकाणी महापालिकेद्वारे आवश्यक व्यवस्था आहे.
--------------------
- चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळी ७१५ जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
- विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्रकिनाऱ्यावरील भुसभुशीत रेतीत अडकू नये यासाठी नैसर्गिक विसर्जनस्थळी ५८७ ‘स्टील प्लेट’ची व्यवस्था करून तात्पुरते मार्ग तयार करण्यात आले आहेत.
- ३३८ निर्माल्य कलश
- १८२ निर्माल्य वाहन
- १८५ नियंत्रण कक्ष
- १४४ प्राथमिक उपचार केंद्र
- ३९ रुग्णवाहिका
- १४५ स्वागतकक्ष
- ८४ तात्पुरते शौचालय
- ३ हजार ७०७ फ्लड लाईट
- ११६ सर्च लाईट
- ४८ निरीक्षण मनोरे
- नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी ३६ मोटरबोट व ३० जर्मन तराफा इत्यादी सेवा-सुविधा व साधनसामग्रींचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
- विविध ठिकाणी संरक्षण कठड्यांच्या व्यवस्थेसह विद्युत व्यवस्था केली आहे.
--------------------
उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात
मास्कचा वापर
सुरक्षित अंतर राखणे
साबण लावून हात धुणे
गर्दी टाळणे
--------------------
- घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावे.
- विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करावे.
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी मूर्तीचे विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे.
- लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाऊ नये.
- विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यास, पूजा करून देण्यास सक्त मनाई आहे.
- कोणत्याही मिरवणुकीस परवानगी नाही.
- विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे.
- पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्या मंडपातच करून घेणे बंधनकारक आहे.