५०० पथके तयार : लस हाती येताच २४ तासांत कार्यवाही सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटनासाठी महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. पहिल्या टप्प्यासह दुसऱ्या टप्प्यासाठीदेखील पालिका सज्ज आहे. दुसऱ्या टप्प्यांतर्गत १० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात आठ केंद्रात सव्वा लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. कोरोनाची लस हाती येताच २४ तासांत कार्यवाही सुरू होईल. पहिल्या टप्प्यासाठी ५०० पथके आणि २ हजार ५०० पॅरामेडिकल तैनात आहेत. दोन ते तीन पाळ्यांत हे कर्मचारी काम करतील.
कोविड लसीकरणासाठी तयारी वेगात आहे. ७ जानेवारीपर्यंत क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. ‘कोविन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आरोग्य सेवकांचा डेटा अपलोड होत आहे. नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत सद्यस्थितीतील वितरण यंत्रणा लस वितरणास वापरण्यात येईल. मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलीस बंदोबस्तअंतर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत.
लसीकरणासाठी कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेली जागा केंद्रिकृत ठिकाणी लस साठवण्यासाठी प्रादेशिक लस स्टोअर म्हणून ओळखली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार कोविड स्टोरेज सुविधा विकसित होत आहे. त्यासाठी प्रशासकीय मान्यता आहे. स्टोरेज सुविधा तयार करताना भारत सरकारच्या मानांकनानुसार कामगिरी, गुणवत्ता, सुरक्षितता निकष समितीकडून पाळले जाऊन परीक्षण केले जात आहे.
तांत्रिक समिती
कोल्ड स्टोरेजसाठी तांत्रिक समितीची स्थापना केली आहे. समितीमध्ये नॅशनल कोल्ड चेन रिसर्च सेंटरमधील तांत्रिक तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य विभागातील तज्ज्ञ आणि यांत्रिकी व विद्युत विभागातील प्रतिनिधी आहेत.
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, वरिष्ठ अधिकारी, सहायक वैद्यकीय अधिकारी या सर्व प्रशिक्षकांचे आवश्यक प्रशिक्षण घेतले जात आहे. हे सर्व प्रशिक्षक आपापल्या केंद्रांवर आणि क्षेत्र पातळीवरील कर्मचाऱ्यांना यांना प्रशिक्षण देतील. हे सर्व प्रशिक्षण ७ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल.
क्रमाने लसीकरण
लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. सर्वात आधी आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्स, नंतर वय वर्ष ५० पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण नियोजित आहे.
- मुंबईच्या साठवणूक क्षमतेनुसार १ कोटी २० लाख नागरिकांना कोरोनाची लस देता येईल.
- बाहेरील वातावरणाचा लसींवर परिणाम होणार नाही.
- प्लस २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले ४० क्युबिक मीटरचे दोन उपकरणे बसविण्यात येत आहेत.
- मायन्स १५ ते मायन्स २५ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले २० क्युबिक मीटरचे उपकरण बसविण्यात येत आहे.
- कांजूरमार्ग शीतगृहाचे काम जानेवारी २०२१ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
- कांजूरमार्ग शीतगृह सकाळी सौरऊर्जेवर व रात्री वीजपुरवठावर चालविण्यात येणार आहे.
- वीजपुरवठा खंडित झाल्यास प्रत्येक युनिटनिहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.
- लसीकरण मोहिमेचे पाच टप्पे आहेत.
- पहिल्या दोन टप्प्यात साठवणूक आणि वाहतूक यांचा समावेश आहे.
- तीन टप्प्यात प्रत्यक्ष लसीकरण होईल.
- लसीकरणासाठी अडीज हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
- हे पालिकेचे कर्मचारी असतील.