महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगरपालिका सज्ज; रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा, अनुयायांसाठी शाळांमध्ये निवाऱ्याची सोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 01:07 AM2019-12-04T01:07:05+5:302019-12-04T01:07:20+5:30
शिवाजी पार्क परिसरात पालिकेच्या सात शाळांत तात्पुरत्या निवाºयाची सोय केली आहे़.
मुंबई : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी मुंबईत दाखल होऊ लागले आहेत़ यासाठी दादर पश्चिम, शिवाजी पार्कमध्ये भव्य मंडप, प्रथमोपचार केंद्र, फिरते शौचालय अशा सुविधा महापालिकेमार्फत पुरविण्यात येणार आहेत़
अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत़ यामध्ये शिवाजी पार्क, चैत्यभूमी येथे व्ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था, तीन ठिकाणी रुग्णवाहिकेसह आरोग्यसेवा, विद्युत व्यवस्था, अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत़
शिवाजी पार्क परिसरात पालिकेच्या सात शाळांत तात्पुरत्या निवाºयाची सोय केली आहे़ येथे दहा हजार जणांची व्यवस्था होऊ शकते़
पालिकेच्या जनसंपर्क विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिकेचे दरवर्षी प्रकाशन करण्यात येते. या पुस्तिकेच्या एक लाख प्रतींचे मोफत वितरण चैत्यभूमीवर होते. या वर्षी गुरुवार, ५ डिसेंबरला महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पुस्तिकेचे प्रकाशन होईल.
शिवाजी पार्क, चैत्यभूमीवरील सुविधा
- एक लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
- शिवाजी पार्क परिसरात १८ फरिती शौचालये (१८० शौचकुपे), रांगेत असणाºया अनुयायांसाठी चार फरिती शौचालये (४० शौचकुपे).
- ३८० पिण्याच्या पाण्याच्या नळांची व्यवस्था. रांगेत व परिसरात असणाºया अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याचे १६ टँकर्स.
- चैत्यभूमी परिसराचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
- शिवाजी पार्क परिसरात ४६९ स्टॉल्सची रचना.
- दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ/उत्तर, चैत्यभूमी व शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष / माहिती कक्ष.
- राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
- स्काउट गाइड हॉल येथे भिक्कू निवास.
- अनुयायांना मार्गदर्शनाकरिता १०० फूट उंचीचे चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसर येथे निदर्शक फुगे.
- भ्रमणध्वनी चार्जिंगकरिता शिवाजी पार्क मैदानातील मंडपात ३०० पॉइंट.
- फायबरची २०० तात्पुरती स्नानगृहे व ६० तात्पुरती शौचालये.
- इंदू मिलमागे फायबरची तात्पुरती ६० शौचालये व ६० स्नानगृह, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत असलेली १५० बाकडे.
- शिवाजी पार्कव्यतिरिक्त वडाळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय व कुर्ला टर्मिनस येथे तात्पुरत्या निवाºयासह फिरती शौचालये.