Join us

यंदा मालमत्ता कराची विक्रमी वसुली; पालिकेच्या तिजोरीत पाच हजार ७९२ कोटी रुपये जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 7:29 PM

आर्थिक मंदी, कोविडचा प्रसार आणि पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांना करात सूट दिल्याने उत्पन्नाला फटका बसला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात ५,०९४ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले.

मुंबई- महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता करातून सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात पाच हजार ७९२ कोटी २२ लाख रुपयांची विक्रमी वसुली झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही रक्कम ७०० कोटी अधिक आहे. १ जानेवारी २०२२ पासून मुंबईतील पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या निवासी सदनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यात आली. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर आलेला आर्थिक भार भरुन काढण्यासाठी कर निर्धारण व संकलन विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 

आर्थिक मंदी, कोविडचा प्रसार आणि पाचशे चौरस फुटांच्या मालमत्तांना करात सूट दिल्याने उत्पन्नाला फटका बसला. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात ५,०९४ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले. सन २०२१-२२ मध्ये ५,४०० कोटी उत्पन्न अपेक्षित होते. शेवटच्या दिवशी ३१ मार्च २०२२ रोजी पाचशे कोटी रुपये जमा झाले आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराचे उत्पन्न ७०० कोटी ९३ लाख ६३ हजार रुपये म्हणजेच १३.७७ टक्क्यांनी वाढले आहे. 

सर्वाधिक वसुली... -गतवर्षीच्या तुलनेत जी/दक्षिणमध्ये (वरळी, प्रभादेवी) सर्वाधिक ३४.३४ टक्के वसुली करण्यात आली आहे. यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यानंतर एफ/उत्तर (सायन, माटुंगा) ३२.९२ टक्के आणि पी/दक्षिण (गोरेगाव ) ३३.७१ टक्के मालमत्ता कर वसुली झाली आहे. शासकीय मालमत्तांकडून मागील आर्थिक वर्षात दोन कोटी एक लाख रुपये वसूल करण्यात आले होते. यंदा ३.८० कोटी रुपये अधिक कर वसूल करण्यात आला आहे. 

विभाग         २०२१            २०२२(आकडेवारी कोट्यवधीमध्ये)

शहरात -    १,४९६.१०           १,७५८.२० 

पूर्व उपनगर -  १,०७०.७१       १,१८८.१६ 

पश्चिम उपनगर - २,५२२.३८    २,८४०.०४ 

(१ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२)

प्रशासकीय विभाग         रक्कम (कोटींमध्ये)

ए) कुलाबा, फोर्ट....  २२२.०४

बी) डोंगरी....  ३९.४८

सी) मरीन लाईन...  ७२.८५

डी) ग्रॅन्टरोड, मलबार हिल....  २४४.०८

ई) भायखळा.... ११०.५९

एफ / दक्षिण (परळ) १६२.१४

एफ / उत्तर (सायन- माटुंगा) १६१.७७

जी / दक्षिण (वरळी, प्रभादेवी) ५२६.८६

जी / उत्तर (धारावी, दादर) २१८.३५

एच / पूर्व (वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ) ४९७.३६

एच / पश्चिम (वांद्रे पश्चिम) ३४२.१३

के / पूर्व (अंधेरी पूर्व) ५२८.८६

के / पश्चिम (अंधेरी पश्चिम )४५३.९०

पी / दक्षिण (गोरेगाव) ३१९.७०

पी / उत्तर (मालाड) २२१.६५

एल (कुर्ला) ... २६३.८२

एम / पूर्व (गोवंडी) ९५.४२

एम / पश्चिम (चेंबूर) १५२.५०

एन (घाटकोपर) १९२.०८

एस (भांडुप) ३१८.३६

टी (मुलुंड)  १६५.९६

आर / दक्षिण (कांदिवली) २००.१४

आर /मध्य (बोरिवली) २००.६८

आर /उत्तर (दहिसर) ७५.५८

शासकीय मालमत्ता  ५.८१

टॅग्स :मुंबई महानगरपालिकामुंबई